Posts

Showing posts from January, 2013

अखिल भारतीय जातीय संमेलन

घेऊ परशु अन् तलवार, घाव करुया वारंवार जातीयता नि विद्वत्ता ही साहित्यास दुधारी धार... नवे जगत् अन् नवे विचार, पोस्टं-मॉडर्न जुने विखार, कालकूट मंथून ऐकुया गृहकलहाचे नवहुंकार.. अभिव्यक्तिची उन्मत्ता, अखिल भारतीय विद्वत्ता, साहित्याच्या बाजारातुन द्वेषाचीच दिसे सत्ता.. जात-पातिचे मेळावे, सरकारी जन खेळावे, गटा-तटांना पोसुन रबरी- चेंडू सम त्यां झेलावे.. नवी जानवी, नवे विधी, छुपे अजेंडे, जुने कधी.. पुरोगामि बुरख्याच्या आतुन, तोड-फोड करण्या संधी... वाद-विवादच व्यवहार्य, मढी उकरणे हे कार्य, संजीवन मंत्राचा द्रष्टा झारितला शुक्राचार्य जात कदापी नाही जात, शस्त्र-शास्त्र-तत्त्वांची साथ, विविधतेत हा एक विचार राष्ट्रहिताची ही रुजवात.. वादे वादे नवीन बोध,  समाजशास्त्रिय नवीन शोध, मिथकांचा हा भव्य पसारा, खोद खोद रे अजून खोद..