आभाळाएवढा मोठा माणूस: प्रा. राम बापट सर
आज सकाळी सकाळी मन उदास झालं...! कारण माहित नाही...! साखरझोपेच्या वेळेतच मला खूप अस्वस्थ वाटू लागलं..खिडकीतून उन्हं येतायत का म्हणून डोळे किलकिले करून पाहिले. पण पडदे लावलेले होते. एरवी पडदे लावले असले तरी सूर्यप्रकाशामुळे डोळ्यातली झोप उडतेच रोज..पण आजचं कारण काही तरी वेगळंच असावं. त्याच अस्वस्थतेत उठलो. उठल्यावर ती अस्वस्थता अधिक गडद झाली. लगेच आईला फोन केला..पण तिच्याशी बोलूनही बरे वाटेना..! उठून अंघोळ केली..देवासमोर उभा राहिलो. नकळत डोळ्यात पाणी तरळले.. कारण.. माहित नाही!
काहीतरी झालंय..किंवा होणार ही अशुभाची जाणीव मनाला थरथरवून गेली. घाई-घाईत तसाच आवरून युनिव्हर्सिटीमध्ये आलो. आल्यावर लॉग-इन केलं..तो माझ्या पुणे विद्यापीठातील मार्गदर्शिका, प्राध्यापक डॉ. कुलकर्णीबाईंचा ई-मेल आला..''काल रात्री प्रा. राम बापट गेले..एक जाणता माणूस गेला..!" मगाशी आलेली अस्वस्थता उसळून बाहेर आली. तिचे कारण कळले..! प्रा राम बापट म्हणजे सुरेंद्र बारलिंगे, ग.प्र. प्रधान, नरहर कुरुंदकर, य.दि.फडके, दुर्गाबाई, इरावती कर्वे अशा दिग्गजांच्या मांदियाळीतील आमच्या समोर वावरणारा, आमच्याशी सहज संवाद साधणारा आणि प्रोत्साहन देऊन, विचार करायला लावणारां एखादा किडा मनात सोडून अभ्यासाला प्रवृत्त करणारा, आम्हा नवख्या विद्यार्थ्यांसाठी सावली धरून राहणारा एक हिमालयाएवढा माणूस..!
असं मी सरांना कितीवेळा भेटलो असेन..? जास्तीतजास्त १२-१५ वेळा..! जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा सरांनी आपल्या बहुमोल वेळातील २-३ तास काढून मला किती तरी गोष्टी सांगितल्या..किती जळमटे अलगद काढून फेकून दिली..आणि मनाला पडणारे कितीतरी संभ्रम हे संभ्रम नसून पायऱ्या आहेत..नवे रस्ते आहेत हे सांगितलं...!
मला आठवतंय तसं मी सरांना पहिल्यांदा बघितलं ते २००५ कि २००६ साली, पुण्यात सर् परशुरामभाऊ महाविद्यालयात..! लोकमान्य टिळकांवर एक अभ्यासकांचा परिसंवाद (बहुधा)तत्त्वज्ञान विभागाने आयोजित केला होता. सर चक्क आम्हा पोरांच्याही मागे, शेवटून दुसऱ्या ओळीत त्यांचा पुढे मी अनेक वेळा पाहिलेला तपकिरी रंगाचा टी-शर्टसदृश सदरा, साधी जीन्स आणि पायात स्पोर्टस् शूज घालून बसले होते. किंचित पांढरे होत चाललेले केस, सावळा रंग आणि भिरभिरते पण गंभीर, आश्वस्त डोळे..गालाच्या उंचवट्यावर किंचित तपकिरी अशा वयोमानाने आलेल्या दोन-चार सुरकुत्यांच्या रेषा..! साधारण तेव्हा सेकंड-इयर कि थर्डइयर बी.ए. च्या वर्गात असलेल्या माझ्या मनात त्यांच्या आजूबाजूस बसलेल्या मंडळींना पाहून हे हि 'कुणी तरी साधना-परिवारातील समाजवादी विचारवंत असावेत..' असा विचार डोकाऊन गेला. खोपोलीसारख्या एका छोट्या शहरातून सर्व-साधारण (कर्मठ नसलेल्या) ब्राह्मणी संस्कार असलेल्या घरातून आलेल्या, माझ्या मनात त्यावेळी साधना परिवारातील लोक म्हणजे नास्तिक, तर्कट पण प्रचंड बुद्धिमान व अभ्यासू मंडळी' अशी एक प्रतिमा होती. त्यापैकीच हे गृहस्थ असावेत असे वाटले. तसं वर्तमानपत्रे, नियतकालिकांचे काही अंक ह्यांतील वैचारिक, सामाजिक लिखाणाच्या वाचनातून राम बापट, गो.पु. देशपांडे हि मंडळी कधीतरी वाचली होती.. व त्यांचा अभ्यास जाणून-ऐकून होतो. डॉ.सदानंद मोरे एक-दोनवेळा घरी आले असताना त्यांच्या बोलण्यातून ही नावे ऐकून त्यांच्याबद्दल उत्सुकता होती. शेजारच्या मित्राने 'ते बघ ते राम बापट..!' असं सांगितल्यावर मी त्यांच्याकडे एखाद्या हिरोला बघावं अशा उत्सुकतेने बघत होतो. ते त्यांनी हेरल्याचं मला जाणवलं आणि मी मग ते तसं बघणं थांबवलं. प्रश्नोत्तरांच्या सत्रात मी काही शंका/प्रश्न विचारले, त्यावर मान्यवर वक्त्यांनी दिलेले उत्तर ऐकून माझे समाधान झाले नाही. भोजन-सत्रात सर्व मंडळी त्यादिशेने जात असताना मी आपलं जाऊन काहीतरी बाहेर खाऊन यावं म्हणून व्हरांड्यातून जिन्याच्या दिशेने निघालो, तो एक थाप पडली पाठीवर..! 'अहो भोजन-कक्ष इकडे आहे..' असं वाक्य हि मागोमाग कानावर आलं! मी मागे बघितलं, तर चक्क बापट सर् होते. मी भारावून गेलो..एवढ्या मोठ्या माणसाने इतक्या आपुलकीने असं सांगणं मला अनपेक्षित होतं. पण विचार करायला अवधी न देता सर बोलू लागले..'कसं आहे..टिळकांच्याबद्दल ते तसं विचारलं तुम्ही, पण तुम्ही ते अमुक अमुक पुस्तक पाहिलंय का? एक काम करा तुम्ही कुठल्या कॉलेजात शिकता..? फर्ग्युसन..? मग ग्रंथपाल कांबळेसरांना भेटा..राम बापटांनी ते पुस्तक सांगितलंय म्हणून सांगा..आणि ते वाचा मग बोलू आपण! विद्यापीठात अमुक ठिकाणी मी अमुक वेळेत असेन, या तिथे!" मला म्हणजे 'पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा..'सारख्या भावनेने आनंद झाला होता. त्या वयात (किंवा अजूनही) अभ्यासकांना भेटणे, त्यांनी सुचवलेली पुस्तके वाचणे वगरे गोष्टी झाल्यावर एखाद्या लहान मुलाला महागडी, इम्पोर्टेड खेळणी मिळाल्यासारखा आनंद होत असे(होतो). पुढे ते पुस्तक वाचून मग सरांना भेटलो..तेव्हा सरांनी जे सांगितलं, ते जे काही बोलले, ते इतकं सहज सोपं काहीतरी होतं..कि 'ते पुस्तक वाचायला सांगण्याऐवजी ह्यांनी तेव्हाच हे का सांगितलं नाही..?'असा प्रश्न पडला. तेवढ्यात सरांनीच उत्तर दिलं..'मुद्दाम पुस्तक वाचा म्हटलं..त्यानं लागणारी शिस्त ह्या बडबडीतून लागते असं नाही.' मग सरांनी आपुलकीने 'मी काय करतो..? संस्कृत घेऊन काय करणार आहे?' इथपासून ते 'कोणता संस्कृत कवी आवडतो?' इथपर्यंत सगळं जाणून घेतलं. 'तसं मी काही संस्कृत वाचलं नाही फारसं तुमच्याएवढं..!' असं काहीतरी ते म्हणाले. पण पुढच्या प्रत्येक भेटीत माझ्या संस्कृतसंबंधित बोलण्यातील तपशीलाच्या कित्येक किरकोळ चुका त्यांनी अलगद काढल्यायत. वेद, उपनिषदे, मनू, याज्ञवल्क्य, चार्वाक, कपिल ह्यापासून ते कालिदासापर्यंत आणि देरीदा, फूको, हाबर्मास, काफ्का, प्लेटो, आंबेडकरवाद, गांधीवाद, सावरकरवादापर्यंत सरांना किती विषयात उत्तम गती होती हे मला प्रत्येक भेटीत कळत होतं..!
पुढे एम्.ए. करत असताना पुणे विद्यापीठात 'इंटरडिसिप्लीनरी स्टडीज्'संबंधित काही विषयांवर सर् काही आठवडे बोलणार होते. आमचे इतिहासाचे प्राध्यापक श्री. मृणाल पाटणेकर यांच्या सांगण्यावरून आमचा प्रसाद मुठे आणि मी तिथे जात असू. तिथे एका एका विषयाचा पदर उलगडत, त्यांच्या एकमेकांशी जुळलेल्या गाठी दाखवत, नवनवीन थीयरीज्, संशोधने ह्यांचे दाखले देत, मधूनच कुणाला तरी चिमटे काढत सर बोलत असत. त्या काळात सरांमुळे भारून गेलेल्या आमचे विचारविश्व तर समृद्ध झालेच पण अभ्यासाच्या कक्षा किती रुंद असल्या पाहिजेत, पुण्यात राहताना ठरलेली क्रमिक पुस्तके व २० वर्षे जुने संदर्भ-ग्रंथ चाळणे हे किती अपुरे आहे ह्याची जाणीव सरांनी करून दिली. पुढे माझं एम्.ए. संपत आलं. रिलीजियस स्टडीजमध्ये पुढे संशोधन करायचे ठरले. थोडं डेअरिंग करून सरांना फोन केला. "एक काम करा.. उद्या विद्यापीठाच्या मेन बिल्डिंगमागे, बहि:स्थ-अभ्यासकेंद्राजवळ ज्या पायऱ्या आहेत तिथे साडे दहा वाजता भेटा.." हि जागा ऐकून मला जरा विचित्र वाटलं. मी आपला तिथे गेलो, ठरलेल्या वेळी. सर् तिथे शेजारी पेरू घेत होते. मला थोडं हसू आलं..''अहो, तुम्हालाही देणार आहे..'' असं सर म्हणाले. मी जरा ओशाळलो. नाही म्हणणे जमणार नव्हते. तिथे पेरू खाता खाता माझं म्हणणं ऐकून घेऊन सर् म्हणाले "डॉ. अॅन फेल्डहाऊस या अमेरिकन अभ्यासिका सध्या इथेच आहेत, त्यांना संपर्क करून भेटा..!! विषय मोठा आहे, narrow down करावा लागेल..इथे बोलून भागणार नाही.. मी औंधला राहतो, घरी येताय कि कसे?" मी म्हटलं, "सर, तुम्ही सांगाल तसं..!" सर म्हणाले, "मी आता घरीच जातोय, तुम्ही तिथे या २ वाजता!" सरांच्या घरी गेलो. आटोपशीर मांडणी केलेली पुस्तके, नेटकी बैठक..अशा त्या बैठकीच्या खोलीत सर खूप काही बोलले, खूप काही सांगितलं..माझा विषय- गुरुसंस्था- स्मृतिग्रंथ- पुराणे- कबीर- नाथ- महानुभाव-गुरु-आधुनिक गुरु संप्रदाय - त्याचे समाजकारण - अर्थकारण - राजकारण हे सगळं सांगताना अगदी वस्तुनिष्ठतेने मांडताना सरांनी अजिबात कुठेहि कडवट अभिनिवेश, धर्म-व्यवस्थेबद्दल किंवा आधुनिक धर्म-व्यवहाराबद्दल कटू शब्द न उच्चारता धार्मिकतेची-सामाजिकतेची उभी संरचना, आर्थिक-सामाजिक कारणमीमांसा ह्याबद्दल आपली मते शांतपणे सांगितली. ही व्यवस्था, त्यात झालेले शोषण, पुरोहितशाही, धर्मसंस्थेचे आजचे स्थान आणि औचित्य, त्यावर पाश्चात्त्य/भारतीय अभ्यासकांची मते, ग्रंथ, श्रद्धाविश्वामागील समाजाची मानसिकता असं बरंच काही अगदी सखोल जात, प्रसंगी देशोदेशीच्या अभ्यासकांचे दाखले देत त्यांनी समजाऊन सांगितलं. वाईमध्ये झालेल्या धर्म-सुधारणा, लेलेशास्त्री, तर्कतीर्थ ह्यांच्या भूमिका, बहुजन समाजातील लक्षणीय जागृती, नवे वैचारिक प्रवाह, धर्मविषयक मानसिकता, समाजातील उतरंड अशा कित्येक गोष्टीनी सरांनी अक्षरश: मला हडबडून जागे केले. पुढे अनेक वेळा मी सरांच्या घरी गेलो, सरांनी मला दरवेळी अशा अनेक गोष्टी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. डोक्यातलं एकन्एक जळमट असं बाजूला पडत गेलं.
सरांची सामाजिक प्रश्नांबद्दल असलेली प्रगल्भ जाणीव, समाजातील प्रत्येक घटकाबद्दल त्यांनी केलेले प्रगाढ चिंतन, त्या प्रत्येक थराबद्दल सरांना असलेली आत्मीयता व त्यांचा समाजातील संपर्क व संचार ह्यातून सरांना ह्या गोष्टी जाणून घ्यायला, शिकायला कुणा तत्त्वज्ञाची गरज पडली नसावी. ''जरा डोळे उघडे ठेवले नं..कि तो तो समाजघटक आपण होऊन त्या समाजाचा इतिहास, सामाजिक-राजकीय पदर आपल्यासमोर आपणहून मांडतो..आपण ते नेमके हेरायचे आणि त्याचा योग्य अर्थ लावायचा" असं सर एकदा मला म्हटले होते.
सरांशी असंच बराच वेळ बोलता आलं ते पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने व व्हिएन्नाच्या इंडोलॉजी विभागाने आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये. सरांचे की-नोट एड्ड्रेस् होतं. सरांच्या त्या सर्वस्पर्शी व्याख्यानाने भारतीय प्राध्यापकांसमवेतच व्हिएन्नाची अभ्यासक मंडळीहि भारावून गेली होती. सरांना सारखं बाजुला घेऊन कुणीतरी गोरा अभ्यासक किंवा अभ्यासिका काही नं काही बोलायचा प्रयत्न करत होती. माझ्याकडे हळूच नजर टाकून खुणेने त्यांनी मला बोलावलं..''चलाहो जरा पलीकडे..फार होतंय आता..!" मग त्यांचं जेवणाचं ताट मी माझ्या ताटासोबत वाढून घेऊन त्या ठिकाणी गेलो..सर आणि मी भोजन-मंडपाच्या पलीकडे दोन खुर्च्या टाकून बसलो होतो. मग "पुण्यातील संस्कृत डिपार्टमेंट आणि व्हिएन्नाचा इंडोलॉजी विभाग हे एक उत्तम कॉम्बिनेशन जमून आलं आहे..पण संस्कृत-अभ्यास हा इंडोलॉजीचा एक भाग आहे. त्यात आपल्यापद्धतीनं अभ्यास करणं महत्त्वाचं आहेच पण ह्या विषयाचा अभ्यास करताना हे व्हिएन्नाच्या लोकांकडे असलेला आधुनिक दृष्टिकोनही बघा..ह्या लिटररी, सोशल थियरीज समजावून घ्या. तुमच्या डोक्यात सध्या घोळणारा विषय संस्कृताभ्यासाच्या मर्यादांत बसणारा नाही. परदेशात अभ्यासाला जायचं म्हणताय तर त्यादृष्टीने वाचा, सर्व बाजूनी तयार राहा. कल्चरल स्टडीज व रिलीजियस् स्टडीजच्या विश्वाची व्याप्ती कित्येकपटीने जास्त आहे." असं सर् मला सांगत होते. सरांचा हा एक-दीड तासांचा सहवास माझ्यासाठी शेवटचा दीर्घ सहवास ठरला. पुढे एक पुस्तक परत द्यायच्या निमित्ताने मी त्यांच्याकडे गेलो. त्यांची काही संस्कृत पुस्तके त्यांना द्यायची होती. पण तेव्हा त्यांना सिमल्याला एका वर्कशॉपसाठी जायचे होते. माझ्या मार्गदर्शिका, डॉ. कुलकर्णी बाईंचा आणि त्यांचा उत्तम संपर्क असल्याने माझ्यासाठी ते त्यांच्यामार्फत काही निरोप देत असत. पुढे बाईंकडूनच मला सर आजारी असल्याचे समजले. मी खूपच अस्वस्थ झालो. आमचा प्रसाद मुठेहि एव्हाना हैद्राबादला पुढच्या शिक्षणासाठी गेला होता..मी एकट्याने त्याना भेटायला जायचे ठरवले, पण तशी परवानगी नसल्याचे कळले. काही महिन्यांनी सरांच्या फोन नंबरवर कॉल केला. कुणी बाईंनी फोन घेतला. "सर् बरे आहेत पण झोप्लेय्त!" हे ऐकून जरा बरे वाटले. मी जर्मनीत निघायच्या आधी, एडमिशन-फेलोशिप मिळाल्यावर सरांना आवर्जून फोन केला, त्यांना फारसे बोलता येत नव्हते, अडखळत बोलत होते.."अभ्यास तर तुम्ही करालच, पण युरोप फिरा, बघा. खूप वाचा..'' असं काहीसं बोलले.
इथे आल्यावर हि सरांची आठवण येत असे. पण संपर्क झाला नाही. "का केला नाही मी त्यांना फोन? निदान कुणी दुसऱ्याने त्यांची खुशाली कळवली असती, तब्येतीची स्थिती कळवली असती..! मी काही नाही निदान प्रार्थना करू शकलो असतो..सरांच्या प्रकृतीसाठी! सरांचा प्रार्थना वगैरेवर विश्वास नसावा पण तेव्हढंच माझ्या मनाला तरी समाधान..!!" अभ्यासक, तत्त्वज्ञ, विचारवंत, प्रेरणास्थान, मार्गदर्शक वगैरे सगळ्या भूमिकांतून मी सरांना थोडेसे समजू शकलो होतो. त्यांच्याभोवती थोडासा वावरू शकलो होतो. सरांनी जे काही-थोड्या भेटीत दिलेय त्यामुळे, त्या आपुलकीमुळे, त्यांच्या त्या प्रगाढ, उत्तुंग ज्ञाननिष्ठेमुळे , तत्त्वनिष्ठेमुळे, अखंड जागृत सामाजिक भानामुळे, संवेदनांमुळे सरांचे माझ्या आयुष्यातील स्थान फारच वेगळे होते आणि राहील. मोठ्या लोकांबद्दल अनेक समज-दंतकथा आपल्या समाजात पसरतात. सरांनी जेएनयूमध्ये तत्त्वे न पटल्यामुळे चक्क पीएचडीच सोडून दिली, किंवा ते अपरात्री एकटेच डोंगर-किल्ल्यांत, दऱ्या-खोऱ्यात हिंडतात,बेफ़िक़ीर कलंदरी आयुष्य जगतात..वगैरे वगैरे..! ते खरे असेल-नसेल माहित नाही..पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मानवी आयुष्याचा, व्यापक अशा समाज-व्यवस्थेतील प्रत्येक कप्प्याचा आपल्या प्रखर ज्ञाननिष्ठेने व मोकळ्या, झापडरहित मनाने धांडोळा घेणारे, माझ्यासारख्या नवशिक्या विद्यार्थ्याला आपुलकीने समजावून सांगणारे, नवीन विषयाच्या पिंका डोक्यात टाकून नवनवीन पुस्तके सुचवणारे आमचे सर आज आमच्यातून निघून गेले. महाराष्ट्राच्या ज्ञानयज्ञातील, वैचारिक-सामाजिक व चळवळीच्या विश्वातील महान पर्व आज कालवश झाले. पण सरांच्या कामातून मिळालेली प्रेरणा हि सर्व अभ्यासकांच्या , चळवळीतील विचारवंतांच्या सोबत कायम राहील, मार्गदर्शक ठरेल!
पुण्यात गेल्यावर त्यांना भेटून मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे आता narrow down केलेला विषय त्यांना सांगणार होतो..त्यावर त्यांनी आणखी काहीतरी सांगितले असते. मग आणिक काही 'अरेच्च्या हे मी मांडलंच नाही!' असं वाटायला लावणारे अनेक मुद्दे सरांनी मांडले असते. पण काही गोष्टी अपरिहार्य असतात. देव असेल/नसेल..आत्मा असेल/नसेल..पण त्यांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती प्रदान करो, अशी प्रार्थना मी करतो! सरांना माझी विनम्र, अश्रुपूर्ण श्रद्धांजली! सर, तुमच्यामुळे खूप गोष्टी मिळतायत, मिळणार आहेत. आणि अनेक गोष्टी समजल्या, अनुभवल्या कि तुमची आठवण होणार आहे. माझ्यासारख्या पोराला अवघ्या काही भेटीतून तुम्ही एवढं समृद्ध झाल्याची जाणीव करून दिलीत, तर तुमच्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचे, जवळच्या अभ्यासकांचे भाग्य माझ्याहून कित्येक पटीने मोठे आणि हेवा वाटायला लावणारे आहे. मी अशा पिढीत जन्मलो, कि आपल्याएवढे मोठे अभ्यासक व आपल्यासारख्यांचे विचार आम्हाला मान्यवर लोकांच्या व्याख्यानांतून, लेखांतून कळले. अजून पुढे आपण घडवलेली उत्तम अभ्यास व मार्गदर्शन करणारी समर्थ अभ्यासकांची पिढी आमच्यासमोर आहेच. पण त्या तुमच्या पिढीतील विद्वानांबद्दल असलेले कुतुहल, आणि भेटायची, त्यांच्याकडून शिकायची इच्छा तुमच्या थोड्याशा सहवासातून काहीशी पूर्ण झाली, त्याबद्दल मी काही अंशी समाधानी आहे.
आपण धुंडाळलेल्या व्यापक समाजातूनच तयार झालेल्या आमच्या श्रद्धेनुसार आपल्या पुण्यात्म्यास परमेश्वर चिरशांती प्रदान करो अशी मी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पुन्हा प्रार्थना करतो... आपल्या प्रेरणेतून काही सकस, वस्तुनिष्ठ काम करायची प्रेरणा माझ्यासारख्या अनेक नवशिक्यांना मिळाली आहे. त्यातूनच आपल्याला उचित श्रद्धांजली वाहिली जाईल अशी आशा आहे.
सादर प्रणाम, सर्!
अशी माणसं जेंव्हा निघुन जातात, तेंव्हा न भरून येणारी पोकळी मागे सोडून जातात...ती आपल्या परीनं अधिकाधिक भरणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल....... ... ... ...
ReplyDeleteबापट सरांना श्रद्धांजली....
हेमंत, फार सुंदर जमून आलाय लेख, अगदी आतून आल्याने भिडणारा.. बापट सरांचा सहवास थोड्या काळापुरता कां असेना तुला लाभला, खरंच भाग्यवान !! सरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
ReplyDeleteभाग्यवान आहेस हेमंत, अशा लोकांचं मार्गदर्शन आणि सहवास लाभला. बापट सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ReplyDeleteहेमंत, तुला त्यांचा सहवास लाभला आणि तुझ्या शब्दांतून मला देखील अश्या विचारवंत व्यक्तीची ओळख झाली. तू लिहिल्या प्रमाणे तुझ्या कामातून त्यांना श्रद्धांजली मिळेच, याच्यात काही वाद नाही..बापट सरांना श्रद्धांजली.
ReplyDeleteबापट सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. खुप छान लेख...
ReplyDelete"असं मी सरांना कितीवेळा भेटलो असेन..? जास्तीतजास्त १०-१२ वेळा..!" .... या एका वाक्यात खूप काही लिहीन गेला आहात.
ReplyDelete"केवळ १०-१२ वेळा भेटले तरी ते गुरु वाटले" ...याहून आचार्यांची जास्त सोपी/समर्पक व्याख्या होणार नाही.
.
"स्टारमाझा" या वृत्त वाहिनी वर ही बातमी rolling caption मधे दिसत होती. मी मुंबईचा, त्यात संस्कृत, इतिहास यांचा दूरचाही संबंध नसल्याने त्या rolling caption बघून सोडून दिली होती.
या लेखामुळे ते किती ज्ञानी, व्यासंगी होते याची जाणीव झाली.
.
आचार्य बापट याना भावपूर्ण श्रद्धांजली.
हेमंत,या गुरुतुल्य माणसाचा केवळ परिचयदेखील होऊ शकेल की नाही असं वाटत होतं ते ब-याच अंशी खोटं ठरवलंस.तुझ्या शब्दाशब्दातून ज्ञाननिष्ठा व्यक्त होते आहे.तू वारंवार सद्भाग्याचा धनी होतोस यात नवल नाही ते याचमुळे.मोठा माणूस काय मागे ठेवून जातो हे वेधक(म्हणून पुण्यतिथ्या जास्त महत्वाच्या)सत्कार्याला कधीही पूर्णविराम नसतो निदान नसावा.अशा अर्धविरामांमुळे वाटणारी जबाबदारी तुझ्यासारख्यांना प्रेरित ठरो.
ReplyDeletehemant, tujhya manat sathalelya bhawana lekhat tashach utaralya aahet...mi UBC madhe 2002 sali aale tyaveli sirani mala recommendation letter dile hote. ani abhyaasachya shishtiwishayi asach kahi sangitala hota. mi tithe asatana pardeshat jaun shikawa yasathi prerana denari ji kahi mojaki manasa hoti tyatale ek mhanje ram bapat sir...indiat gelyawar mi tyana shakya hoiparyant bhetayala jat ase..pan gelya varshi chya evdhya dirgh mukkamat suddha nahi jhala jana..aata vaait vaatat aahe...
ReplyDelete(बहुधा पु. लं.चं) 'ज्यांना नमस्कार करता येईल असे फार थोडे पाय उरलेत आता' हे वाक्य ज्यांच्या संदर्भात म्हणता येईल असा एक माणूस गेला..
ReplyDeleteचांगला लेख आहे. ब्लॉगच्या माध्यमातून अशा थोर व्यक्तींबद्दल लिहून ठेवता ते चांगलं वाटलं.
ReplyDeleteGot the reference of your blog from "Vachave Netake".(Daily Loksatta).
ReplyDeletePresentation is simple and intimate.
Best wishes.
धन्यवाद! :-)
Delete