फेसबुकावर टगे-सोयरे





जर्मनीत येऊन आणि फेसबुकचा वापर सुरु करून एक वर्ष झालं! हे असं वर्ष-तिथी-तारीख वगैरेंचा हिशेब मांडताना माझं मलाच हसू आलं ! पण विषय आहे फेसबुकचा...त्यामुळे तिथी, पंचांग, अध्यात्म, क्रांती, पुरोगामी, ब्राह्मणी-अब्राह्मणी ह्या शब्दांचा वापर केल्याशिवाय, या न त्या माध्यमातून स्टेटस अपडेट केल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय फेसबुकचा फील आल्यासारखे वाटत नाही. असो..! (सुरुवातीलाच हा 'असो' आल्यामुळे ह्या शब्दांचा किती उबग आला असेल हे सूज्ञांस कळू शकेल!) तर..सांगायचे असे कि जर्मनीत आल्यापासून अस्मादिकांचा फेसबुकावरील संचार वाढला! तसे पूर्वी मी ऑर्कुट वापरत असे. पण माझ्या एका अल्बमच्या प्रकाशन कार्यक्रमात एका मोठ्या, नामांकित व्यक्तीने 'फेसबुक पर मिलते रहो..!' असे सांगितल्यामुळे मी ह्या झुकरबर्गाच्या 'लवासा'मध्ये ((रावणाच्या लंकेत' या चालीवर वाचावे)प्रवेश करते झालो. तेव्हा हे 'लवासा' डेव्हलपिंग फेजमध्ये होतं. ऑर्कुट तेजीत होतं. पण मला या सोशल नेटवर्किंग साईट्सरूपी लंकेच्या, सर्वांना अक्सेस करण्यास मुभा असलेल्या सिक्रेट चेंबरमध्ये एवढ्या चर्चा होतात, अस्मितेची वादळे उठतात, 'राष्ट्र-हिताचे आराखडे' आखले जातात, (फेसबुकापुरत्या का होईना) ई-मोहिमा राबवल्या जातात याची कल्पना इथे येण्यापूर्वी नव्हती.

फेसबुकवर अनेक घडामोडी बघायला मिळाल्या..! जर्मनीत राहून भारतात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या अपडेट्स, लोकांची साधारण मते, मानसिकता, प्रवाह, चळवळीत काम करणारी माणसे, प्रसिद्ध व अप्रसिद्ध विचारवंत, प्रतिभाशाली कवी, बिलंदर अवलिये, जुने दोस्त, नवे दोस्त, नीती-अनीती, स्नेह द्वेष, राडे, लफडी, झेंगटं, तथाकथित 'ए-ग्रेडी', 'बी-ग्रेडी' 'सी-ग्रेडी' माणसे, त्याचे 'छंद', वेळ-काल-वय हरपून प्रकट होणाऱ्या सहज लीला आणि जगभरातील अगदी कॅलिफोर्नियामधल्या LA पासून ते पुण्यनगरीतील Z-ब्रीज पर्यंत प्रकट होणारे मानवी आविष्कार हे सारं सारं पाहून विश्वरूप-विश्वरूप म्हणतात ते हेच अशी भावना मनास स्पर्शून न जाईल तरच नवल! अर्जुनाचे भाग्य  या झुकरबर्गाने आपल्या पदरात टाकले आहे, ह्या भावनेने अस्मादिकांच्या मनात अष्ट नसले तरी दोन-चार सात्त्विक भाव जागृत होतात. महाभारतानंतर सर्व जगद्वस्तूंना हात घालण्याचे व ते सारे विषय उच्छिष्ट स्वरूपात('व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं'प्रमाणे) समाज-पुरुषाच्या ताटात घालण्याचे हे महत्कार्य या फेसबुकाने केले आहे, ही गोष्ट निश्चितच इतिहासाच्या बुकात प्ल्याटिनमच्या अक्षरात नोंदवली जाईल. अजून तरी इतिहासजमा न झालेल्या ह्या वर्तमान महापर्वातील माझ्या वाट्याला आलेल्या काही पात्रांची कहाणी 'हरीश भिमाणी'साहेबांच्या थाटात सांगत आहे; आपण ती त्यांच्याच आवाजात, उचित चढ-उतारादि फेरफार करून वाचावी अशी माफक अपेक्षा:

भाग १: 
फेसबुकवर नव्याने आलेल्या बालकांच्या लीला बघून खूप हसू येतं. आमच्या कुठल्याशा तरी लांबच्या नात्यातल्या, खोटं वय लावून फेसबुकवर आलेल्या पठ्ठ्याच्या  दैनंदिन अपडेट्स बघून हसून वेडं व्हायची वेळ येते...! त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे:

१) ( भारतीय प्रमाणवेळ: ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig..

२) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) : oopeeth khayla yaa@Kurundwad

3) (भारतीय प्रमाणवेळ: ११.००) : chyayla, raaw kantalaa ala raao..yetaa kaa nadiwar dumbuya?

4) (भारतीय प्रमाणवेळ: 2.00) : hi mitr-mitrinino..dupaar jhali..yaa   jhopaylaa..! :D

5) (भारतीय प्रमाणवेळ: 4.00): @ ghhadge andi depo for bying eg.........................

6) (भारतीय प्रमाणवेळ: 8.00) : gud nayiet frend..udya bhetu..!

ह्या पोस्ट्सखाली कुठल्यातरी फेक-प्रोफाइल असलेल्या, अनुष्का शर्माचे चित्र असलेल्या 'श्रावणी गुप्ता' नामक ललनेचा एक लाईक असतो आणि त्याखाली..Thank Shravni..u look butiful अशी एक प्रोफाईलधारकाची कॉमेंटही असते..!

भाग २:

विविध समूह आणि माणसे:

फेसबुकावरील (निदान) मराठी भाषिकांचे समूह हे किती सात्मीकृत अर्थात एकजीव आहेत हे चाणाक्ष वाचकांना व जाणकार फेसबुक-एडीक्ट लोकांना कळून येईल. ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद,  हिंदू-मुसलमानशिवाजी महाराज आणि अस्मिता, राजकारण-राजकारणी व भ्रष्टाचार, देव-देश-धर्म अशा अनेक मुद्द्यांवर ही मंडळी आपापल्या आघाड्या सांभाळत असतात. ह्या सर्व मंडळींच्या त्यांच्या-त्यांच्या भूमिकांप्रति असणाऱ्या निष्ठा ह्या वादातीत सच्च्या असतात. कधी मूळ स्वरूपात तर कधी जुन्या बादशहा/सम्राटांसारखं बेमालूम वेषांतर/ 'प्रोफाईलांतर' करून अनेक प्रकारच्या प्रवृत्ती इथे वावरत असतात! वेषांतर करून परिस्थितीचा आढावा घेणे ह्यात काही चूक आहे असं मला अजिबातच वाटत नाही.(माझं असलं एकही वेषांतरित स्वरूप/फेक प्रोफाईल नाही हे इथे आधी सांगून ठेवतो.) नामू परीट, लखू रिसबूड, पावश्या भगत, चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य इथपासून ते छोटा डॉन, लंगडा घोडा, बेरकी बैल अशा अनेक नावांनी या प्रोफाईल अर्जुनाच्या आत्मविश्वासाने व भीम-दुर्योधनाच्या आवेशात वावरत असतात!

पण ह्याच्याही पलीकडे जाऊन फेसबुक हा स्वतःचे ईगो चुचकारण्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुषामध्ये दडलेल्या तर्कशुद्ध विचारवंतासअलौकिक कविवर्यांस, निष्णात कलाकारास, हजरजबाबी माणसास, पुरोगामी विचारवंतास, धर्मनिष्ठ उपासकास, 'विरक्त' साधकास, कळकळीच्या कार्यकर्त्यास, छछोर प्रेमवीरांस आणि भटकभवान्या मुलींना अभिव्यक्त होण्यास मिळालेले एक फुकटचे व्यासपीठ आहे, असे अस्मादिकांचे निश्चित मत झाले आहे. असेच ह्या 'भित्तिचित्रां'वरील आणखी काही अक्षर-नमुने येणेप्रमाणे:

प्रोफाईल :

१) विस्मय हा. चकिते

(Works at : दुधाच्या रिकाम्या पिशव्या गोळा करून त्या विकून चरितार्थ चालवत असतानाच  स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करणे)

आण्णा हजारेंनी उपोषण करायचा निर्णय का घेतला? त्यांना गांधीवादाची मूळ तत्त्वे माहितेय्त का? आजच्या जगात मुल्यांचा ऱ्हास होतोय. अशा नेत्यांनी समाजाला मूल्ये शिकवू नये. एकविसाव्या शतकात जागतिकीकरण होताना दुधाच्या पिशव्यांमुळे होणारा कचरा ही मूलभूत समस्या आहे.  सानेगुरुजी, गाडगेबाबा ह्यांनी तेव्हा स्वच्छतेचे महत्त्व सांगितले होते. त्यामुळे ह्यांनी आमच्या भावनांशी खेळताना स्वच्छतेचे महत्त्व ध्यानात घ्यावे. शेतकऱ्यांची आत्महत्या हा मुख्य प्रश्न असताना  ह्यांना भ्रष्टाचाराची काय पडलीय...? सामान्य जणांच्या समस्यांकडे हे लोक पाहणार की नाही..?



२) सुयोग योगीश्वर कोटीभास्कर
(धंदा: निवृत्त IT कर्मचारी, सॉफ्टवेअर इंजिनियर, सध्या अगरबत्ती, शंख-चक्र-मूर्ती-श्रीयंत्रादींचा व धार्मिक साहित्याचा व्यापार)

सकाळी सकाळी ब्रह्म-मुहूर्तावर (ह्यांना ब्राह्म असे म्हणायचे आहे) सूर्यस्वर चालू असताना नादब्रह्माची आलेली आजची अनुभूती  म्हणजे साक्षात निर्विकल्प समाधीचाच अनुभव असल्याचे मला माझ्या सद्गुरूंनी तेव्हाच समाधी-अवस्थेत दर्शन देऊन सांगितले. ह्याच अनुभूतीसाठी जगणे हेच मानवी जीवनाचे ध्येय असले पाहिजे. आजवर मोठमोठ्या हर्ले-डेव्हिडसन वगरे गाड्यांवरून लंडन, न्युयॉर्कसारख्या शहरांतून फिरलो, नोकिया ६६१० पासून आय-फोन, आय pad, Tablet PC, फार्म हाऊस, बंगला सगळं उपभोगलं आणि उपभोगतो आहे.. पण हे इथेच सोडून जायचंय ही जाणीव कायम मनात होती. त्याचाच परिपाक म्हणजे  उन्मुक्त, मोकळ्या मनाने सौंदर्याचा, भौतिक सुखाचा कुणालाही न डरता आस्वाद आजही मी घेतो. पण शाश्वत सुख हे साधनेतच आहे हे आज जाणवले! असो..उद्या २०,००० रुपये किमतीचे विश्वबीज-चक्र-यंत्र घेणार आहे. त्यावर ध्यान केंद्रित केल्यास तत्काळ कुंडलिनी जागृत होते असा अनुभव बोस्टन येथील MNCमध्ये काम करणाऱ्या माझ्या बहिणीस आला आहे. आपल्याला हे यंत्र माहित आहे काय? ह्यासंबंधी आपला अनुभव काय आहे? आपण तो शाश्वत नादब्रह्म ध्वनी ऐकला आहे..?



३) बबडू व्यक्तिवल्ले (फेक प्रोफाईल):
(निवास: कामागोटा स्ट्रीट, नैरोबी, केनिया. 
धंदा: नैरोबी, केनिया येथे कोळशाच्या खाणीत सुपरवायजर, केनिया हिंदूराष्ट्र मंच- स्वीकृत पदसिद्ध सदस्य)

साल्या ह्या सरकारच्या आयचा घोव..! कसाबला बिर्याणी खायला घालून वाढवला, अफजल गुरूला दाढी करायला महाग आफ्टर-शेव्ह देत असतील. ह्या सरकारला घाला चुलीत!! विदेशी मूळ असलेली बाई आमच्या देशात येतेच कशी..? तिला तिच्या देशाचा अभिमान असता तर देश सोडून आली नसती. आमच्या देशाची काळजी वाहणारे असे आमचे नेते हि विदेशातून आयात करावे लागतात..? हे दुर्दैव आहे. आसिंधुसिंधू हिंदू बांधव एक झाला नाही तर ह्या हिन्दुभूचे अस्तित्वच धोक्यात येणार हे नक्की! आम्ही मग या देशात राहायचे तरी कसे? अवघड झाले आहे राहणेदेखील. 


४) अस्मादिक लुडबुडे:
भारतीय संस्कृतीच्या इतिहासाच्या खाणाखुणा तपासताना सर्व बाजूंनी त्याचा विचार होणे आवश्यक आहे. मात्र हे करीत असतानाच आपला अधिकाधिक फावला वेळ फेसबुकवर घालवून समकालीन समाजाची स्पंदने लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात आज फेसबुकसारख्या साईट्समुळे परदेशात राहूनही देशी लोकांशी सम्पर्कात रहाता येते ह्यासारखा चमत्कार तो काय..? संजयाच्या दूरदृष्टीच्या सिद्धीचे मूर्त स्वरूपच ह्या झुकरबर्गाने आपल्यासमोर साकार केले आहे. तस्मात् इतिहास पुरुष ह्या फेस्बुकाचे उपकार कधीही विसरणार नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------


अशारीतीने अनेक प्रकारच्या टग्या-सोयऱ्यांशी व  अस्मादिकांच्या नव्या पैलुंशीसुद्धा ह्या फेस्बुकावर वावरताना नवी ओळख झाली! काही लोक कडकडून भेटले, तर काही तडतडून भांडले. काहींनी संयम शिकवला, काहींनी मनोरंजन केले. काही जण टाईमपास म्हणून बरे वाटले तर काहींचे ठरलेल्या कट्ट्यावर भेटणे हा नित्यविधी बनून गेला. लोकांच्या वेगवेगळ्या मतप्रणालीतून, गमतीदार पोस्ट्समधून, संयमित विचारातून, काहींच्या गलिच्छ विचारसरणीच्या प्रदर्शनातून, काहींच्या अंगभूत मोठेपणातून खूप काही बघता आलं, शिकता आलं, जाणून घेता आलं..! आभासी विश्वात सन्मानाने वादपटुत्व मिरवणाऱ्या या लोकोत्तर मंडळींकडे असलेली विजिगीषा, माहिती, ज्ञानतृष्णालोकविलक्षण जनसंपर्क व नियोजन-कौशल्ये बघून आमच्या देशातील नव्या पिढीत प्रचंड गुणवत्ता ठासून भरल्याची जाणीव जशी होते तशीच ही गुणवत्ता चाळीवरच्या सार्वजनिक भांडणात वाहत्या राहिलेल्या नळातल्या पाण्यासारखी वाया जाते याचे दुःखही अपार आहे. आमच्या देशातली चाळ-संस्कृती नष्ट झाली असली तरी मनातल्या चाळी आणि तिथले चाळे अद्याप अनंतात विलीन झालेले नाहीत याचे भान आमच्या लोकांना येईल तोच सुदिन!


अर्थात इतिहासाप्रमाणेच वर्तमान-जगातही चिखल आणि त्यात उगवलेली कमळे दोन्ही आहे. कमळे हवी असतील तर चिखलात जावे लागेलच. चिखलात रुतून पडायचं, की कमळे तेवढी काढून अलगद बाहेर येऊन पुढे जात रहायचं हे आपलं आपण निवडावं! देवानं तेवढी साधारण बुद्धिमत्ता प्रत्येक फेसबुक प्रोफाईलधारकास दिली आहे. खरं तर अशा इतरही अनेक वल्ली इथे गवसल्यायत. त्यांची चित्रणे पुढे करायचा विचार आहेच! तूर्तास बरेच दिवस पोस्टची वाट बघणाऱ्या या ब्लॉगास कृत्रिम पावसाद्वारे मिळालेले ओंजळभर पाणी घालून त्याचं चैतन्य जागृत ठेवण्याचा हा प्रयत्न इथे थोडक्यात साध्य झाला असे समजतो!  

Comments

  1. अरे वाह हेमंत बाऽबूऽऽऽ ... आपने तो फेसबुकको उसके असली रूप में रंगा दिया --- शा. मार्कजी झुकरबर्गजी चाळ !

    ReplyDelete
  2. प्रसाद वैद्यAugust 2, 2012 at 9:47 PM

    मस्त रे भावा

    ReplyDelete
  3. हा हा ! ! ! फार सुंदर अन नेमकं लिहिलयस :)

    ReplyDelete
  4. झुकेरबर्गचं लवासा!...आवडलं!

    ReplyDelete
  5. बटाट्याच्या चाळीनंतर, हीच एकमेव........ "फेसबुकाची चाळ" !

    ReplyDelete
  6. शब्दा शब्दात पुलं भरलेत ठासून...

    :)

    ReplyDelete
  7. लाखातलं लिहिलात राव, आमच्याच भावना शब्दबद्ध केल्यात.
    प्रत्येकाने हे जरूर वाचावे....

    ReplyDelete
  8. facebook var ye ...baghatoch tulaa :D :D :D

    ReplyDelete
  9. ह ह पु झा झाले

    हसून हसून पुरेवाट झाली.

    ReplyDelete
  10. Chhan ahe lekh. Awadala. Fakt ekada font size tapasun ghet. Kahi olit font size lahan motha zalay.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

पूर्वमेघ

जय हो...