आरती अँग्लो पाक्-हिंदुस्थानाची
'आसिंधुसिंधू वगैरे हिंदुस्थान' किंवा 'आमची अनादि-अनंत महान संस्कृती' वगैरे पोकळ गफ्फांना वैतागून, 'अध्यात्म-धर्म' वगैरेच्या बाजाराला विटून, इतिहासादिंविषयीच्या वृथा अभिमानाचे डंके असह्य होऊन, आणि इतिहासाच्या सत्या-सत्यतेच्या राजकारणाला बलपूर्वक चरणस्पर्श करून...
देवतांना माणसाळवणाऱ्या वग-नाट्यपरंपरेतील शाहिरांना स्मरून, पुरोगामी न्यूज-चॅनल अँकर्सच्या उच्चभ्रुत्वनिदर्शक आकांडतांडवी 'आगळ्यावागळ्या' वर्तमानाकडे सक्रोध कटाक्ष टाकून, मार्क्सवादी-समाजवाद्यांच्या सुखासीन होत गेलेल्या इतिहासाला दुर्लक्षित करून, आजकाल बहुतांशवेळेस केवळ मौखिकव्यापारासाठीच औचित्यपूर्ण ठरत असलेल्या त्यांच्या विद्वत्तेला
स्मरून व जगातील वास्तवे नाकारत आपल्या विश्वात रमणाऱ्या हस्तीदंती घरांतल्या विचारवंतांना हाड्ड म्हणून...
इतरांना भोचकपणे खिजवत सुखाने जगणाऱ्या हॅप्पि गो लकी ड्यूड्स् वगैरेंना
विनम्र अभिवादन करून आणि
पुरोगामी-प्रतिगामी-धार्मिक-नास्तिक-कम्युनल-नॉनकम्युनल अशा सर्वांच्या
अहंकारांना चुचकारून दक्षिण-आशियायी इतिहास-धर्म-भाषा विषयात काम
करणाऱ्या, आटपाट नगरीत उञ्छ-वृत्तीने राहणाऱ्या, स्मरणरञ्जनरत, क्षीणबुद्धि अशा गरीब
ब्राह्मणाने दृष्टांत देऊन विभक्त झालेल्या या उपरिनिर्दिष्ट दोन दक्षिण आशियायी देशांची आरती लिहवून घेतली.
या दृष्टांताचे कारणैकमात्र अशा ऐसी अक्षरे या संस्थळावर आयोजित केल्या गेलेल्या या उन्मुक्त काव्यस्पर्धेत ही आरती घुसडली, तीच येथे डकवित आहे. संस्थळसञ्चालक व स्पर्धेच्या-आयोजकांचे आभार!
प्रस्तुत रचनेत आढळून येणारा, समाजात रूढ झालेल्या काही विशिष्ट समूहवाचक शब्दांचा वापर केवळ त्यांच्या रूढार्थाचा फोलपणा व अनौचित्य दर्शविण्यासाठीच उपहासाने केला आहे. वाचकांनी त्यात जातीय-धार्मिक-प्रादेशिक-अस्मिताजनक वाद वगैरे निघतील अशी खुसपटे काढत बसू नये! तसा हेतू येथे अजिबात नाही हे वेगळे सांगणे न लगे! असले मुद्दे काढून भांडण्याचा प्रयत्न केल्यास पुण्यातील १२-१५ वर्षांच्या वास्तव्यात आलेल्या अनुभवाचा व मिळालेल्या शिकवणीचा पुरेपूर वापर करून आपल्यावर वाग्बाण सोडण्यात येतील.
तेव्हा, वाचा.. अन् एन्जॉय करा!!
बोलो सब संतन की जय!!
आरती अँग्लो पाक्-हिंदुस्थानाची
(चाल: सुखकर्ता-दुखहर्ता / धोंडो जोश्याच्या तीर्थरूपांचं, भिकाजी जोश्यांचं 'स्वकुलतारक सुता सु-वरा..')
वैकुंठाचे आधी, कैलासापुर्वी
विश्वोत्पत्तीच्याही अर्लीयर-पर्वी |
ईश्वर-निश्वसितांना ठेऊनि हो गिरवी
येथील दुनियादारी जग सारे फिरवी ||
जय-देव जय-देव पाक्-हिंदुस्थाना
आर्यांच्या लुटलेल्या भ्रष्ट जनस्थाना|| जय देव जय देव..
खापर-मुद्रा-चिह्ने-अगम्यलिपिसारी
लोथलगोदी-महाबाथ्रुम लै भारी|
इन्फ्रास्ट्रक्चर प्राचिन-सहाहजारी
संपले संपले सगळे कलियुगबाजारी||१|| जय-देव
गोरे हिरण्यकेशी वैदिक जन आले
मन्त्र-उपनिषदांनी जग सॅक्रेड झाले|
पिडले वंशजांनी दीनजनां पिडले
अन् परिणामी तेची रौरव जगि पडले||१|| जय-देव..
बुद्ध-प्रिन्सिपल्सची होते दीवाळी
महावीराच्या तत्त्वां फोडा हरताळी|
ब्रह्मचि एव्ह्रीथिंग कानी कपाळी
फिय्यास्को हो सगळा तत्त्वाची होळी||२|| जय-देव..
पुरुषोत्तम मर्यादा पाळत ऊदंड
सोळा सहस्र बाया सॉल्लिड हजबंड|
वॉरफील्डवरती गीता गात असे गॉड
पञ्चपतिव्रति बाई ती अल्ट्रामॉड||३|| जय-देव..
गोरे कनिंग-हॅऽम साहेब्लोक आले
संस्कृती-कंट्रीला त्यांनी व्यापियले|
पुनरुज्जीवित धर्मा डिलॅपिडेटियले
भ्रष्टवुनी संस्कृति वेस्टनाईझ केले||४|| जय-देव..
इंग्रजि शाळा शिकुनि लोक मातले
विज्ञानव्यवहारे प्रॅक्टीकल झाले|
संस्कृति कंडम म्हणुनी कर्दमि पातले
फ्रीडम मिळवुनि देश दुभंग पावले||५|| जय-देव
बी इट पाकिस्तान, बी इट भारत
आसिंधु-सिंधु गोग्गोड ड्रिम हो खारट|
चवदा-पंधरा ऑगस्टि शायनिंग मारत
बघवेना मजला, मी, जर्मन-जन-रत||६|| जय-देव...
(लेखनातील ऱ्हस्व-दीर्घात्मकतेच्या विस्कळीतपणातून काही ठिकाणी वृत्तबाध होत असल्याने त्यातील त्रुटी दाखवून दिल्याबद्दल मा. श्री. अभिजीत ताम्हाणे ह्यांचे विशेष आभार!)
(लेखनातील ऱ्हस्व-दीर्घात्मकतेच्या विस्कळीतपणातून काही ठिकाणी वृत्तबाध होत असल्याने त्यातील त्रुटी दाखवून दिल्याबद्दल मा. श्री. अभिजीत ताम्हाणे ह्यांचे विशेष आभार!)
mastch
ReplyDeleteBadhiya.
ReplyDeleteZAKKAS
ReplyDeletemast
ReplyDeleteसही जबरदस्त एकदम.......... खूप दिवसांनी ……
ReplyDelete