पूर्वमेघ


"आषाढस्य प्रथमदिवस:|"


अर्थात कालिदास दिन!


आजच्या ह्या विशेष दिनी ब्लॉगद्वारे लिखाण करण्याचा प्रयत्न सुरु करत आहे! केवल भाषा-साहित्य-इतिहास-धर्म-संस्कृती-समाजशास्त्र अशा माझ्या नेहमीच्या व आवडीच्या विषयांत न अडकता मनातील विचार, अनुभव, टक्के-टोणपे, तथाकथित सभ्य शिष्टाचारी सोवळ्या मनांना क्वचित आवडणार नाही असे आमची अंगभूत टगेगिरी दाखवणारे लिखाणही ह्या ब्लॉगाद्वारे आपल्यासमोर येईल! 


या वेळचा हा भारताबाहेर पहिलाच कालिदास दिन! भारतात असताना कधी फर्ग्युसन महाविद्यालयात तर कधी खोपोलीला घरी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कालिदास दिनासाठीच्या सभेत काही नं काही वाचन होत असे..! कधी जाहीर तर कधी स्वतःपुरते! आज तो नेम न मोडता इथे हां वार्षिक परिपाठ-प्रपंच!

श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसे  "तेथ अभिप्रावोचि अभिप्रायाते विये| भावाचा फुलौरा होत जाये| मतीवरी||" ह्यानुसार लिहीत राहेन..चालत राहेन... आपल्या अभिप्रायातून, मार्गदर्शनातून अधिकाधिक ज्ञान, आनंद  गवसेल ही खात्री आणि ''चरैवेति'' ह्या वेदवचनाची साक्षही तेथे आहेच!


कालिदासाच्याच भाषेत लिहायचे झाले तर : 'मंद: कवियश:प्रार्थी  गमिष्याम्युपहास्यताम्|' ( यशाची प्रार्थना करणारा/इच्छा असणारा मंद, अज्ञानी लेखक मी, त्यामुळे लिखाणातील चुकांमुळे हसे होणे आलेच) त्यामुळे सूज्ञ वाचक-वर्गाने वेडेवाकुडे बोल समजून घ्यावेत अशी प्रार्थना!  


तर आजचा दिवस हां  सर्व साहित्यप्रेमींसाठी एक विशेष दिवस! कालिदास दिन!


संस्कृत कळू लागल्यापासून दरवर्षी कालिदास-दिन 'मेघदूत/ रघुवंश/ कुमारसंभव' वाचण्यात जातो! अगदी कितीही महत्त्वाची कामं असली तरी! 


दर आषाढ-प्रतिपदेला 'कालिदास' नावाचं गारुड मनाला हुरहूर लावतं...सोडत नाही ! पाऊस असो; नसो...दरवर्षी या दिवशी आभाळ भरून येतंच !! त्याला हुरहूर लागत असावी...कालिदासाच्या विरहाची ! ते पाणी ढाळत कृतकृत्यतेने सांगतं..की कालिदासाच्या यक्षाचा संदेश त्याच्या प्रेयसीला मीच पोचवलाय...!! माझी अनामिक हुरहूरही तशीच वाढत जाते...मेघांच्या एकमेकांत गुंतलेल्या आकृतीसारखी!!


कालिदास ह्या माणसाने त्याच्या उपमाविशेषामुळे, काव्यामुळे जुन्या जाणत्या वाचकांच्या मनात अढळपद मिळवलंय पण आज माझ्या पिढीसाठी कालिदास फक्त 'कुणीतरी' संस्कृत कवी म्हणून उरला आहे! फारतर काही जिज्ञासू मंडळी शांताबाई शेळकेंच्या अनुवादातून त्याच्याशी परिचय करून घेतात! त्यांना कालिदासाची महती तिथे कळते! एरवी संस्कृत भाषेप्रत असलेल्या अनास्थेमुळे किंवा तिच्यासंबंधी असलेल्या दुर्बोधतेच्या गैरसमजामुळे ह्या मोठ्या आनंदास लोकं मुकतायत.

मात्र त्याच्याशी जोडलेल्या काही कथा तेवढ्या बऱ्याच जणांना ऐकून माहित असतात! तो मुळात साधा गुराखी होता, मग तो एका कटाद्वारे राजकन्येचा पती झाला, मग राजकन्येस त्याचे मूलस्वरूप कळताच तिने त्याला हाकलून दिले.. पुढे देवीच्या प्रसादाने तो प्रकांड-पंडित झाला वगैरे..वगैरे..| त्याच्या मृत्युसंबंधी देखील अशाच काही दंतकथा आहेत. श्रीलंकेच्या राजाच्या निमंत्रणावरून तिथे गेला असता एका वेश्येमुळे त्याचं खून झाला, वगैरे! पण एक नक्की की, जगात भरपूर टक्के-टोणपे खात आयुष्याची सगळी रूपे अगदी खंबीरपणे अनुभवणारा कालिदास हां त्याच्या ह्या भरभरून ओसंडणाऱ्या जिजीविषेतूनच 'महाकवी कालिदास' झाला! आणि "तितीर्षुर्दुस्तररं मोहादुडुपेनाsस्मि सागरम्| " असे म्हणत, रघुवंशाचे माहात्म्य कथन करतणे अवघड असल्याचे सांगत, आपण अव्वल महाकवी आहोत हे सहज सिद्ध करून गेला..कुठल्याही अभिनिवेशाशिवाय!

असो..

आजच ह्या ब्लॉगचा शुभारंभ करायचे ऐन वेळी ठरल्यामुळे कार्यव्यग्रतेमुळे आज फार न लिहिता केवळ बा.भ.बोरकर ह्यांनी मराठीत समश्लोकी-समवृत्त  अनुवाद केलेल्या मेघदूतातील आरंभीचा काही भाग (जेवढा मला पाठ आहे तेवढा-आठवेल तसा घाईघाईने) टाईप करून मित्रांसाठी सादर करतो. ते वाचून बोरकरांच्या भाषासामर्थ्यासोबतच कालिदासाची अप्रतिहत प्रतिभाशक्ती व अचाट काव्यसामर्थ्य ह्याची झलक आपल्याला दिसेल! आणि जर अनुवादातून हां आनंद मिळतोय तर दुर्बोध मानल्या गेलेल्या पण मुळात सोप्या-सहज अशा संस्कृतात मूळ कालिदास वाचण्याचा आनंद किती उत्कट असेल ह्याची कल्पना ही वाचकांस येऊ शकेल!

महाकवी कालिदासकृत मेघदूत 

(बा.भ. बोरकर ह्यांचा समश्लोकी-समवृत्त अनुवाद, वृत्त : मंदाक्रांता)


कोण्या यक्षाकडुनी घडूनी, काही कर्तव्यदोष

स्वामीशापे सखीविरही तो,गुंतला एक वर्ष

कंठी अस्तप्रभ दिवस तो, रामगिर्याश्रमात

सीतास्नाने जलशुचि जिथे, वृक्ष छायार्द्र दाट


शैली त्या तो प्रणयि इतुका, काही मासांत भागे

की स्वर्णाचे वलय गळूनी, कोपरा थेट लागे

आषाढाच्या प्रथम दिवशी, टेकला अद्रिरेखे

दन्ताघाती समद गजसा, देखणा मेघ देखे


उत्कंठेने कनकपतिचा, दास कष्टे पुढे ये

अश्रू पोटी गिळूनि घडि तो, चिंतनाक्रांत राहे

होती चित्ती विचल सुखीही, पाहता मेघ जेथे

कंठक्षेमातुर सखि दुरी, कोण त्याची दशा ते


धाडू कांते कुशल, भिजल्या श्रावणी धीर द्याया

या भावे तो फुलुनी सजला,त्याजला आळवाया

वाही ताजी कुटजकुसुमे,कल्पिल्या अर्घ्यदाने

बोले शब्द स्मितमधुरसे,स्वागताच्या मिषाने


धूमज्योती पवन सलिलें, साठला मेघ कोठे?

आणि ज्ञानेंद्रियपटू जिवें, न्यायची गोष्ट कोठें!

औत्सुक्ये तो अवगणुनि हें, आळवी त्यास भावें

कामार्तांना जड अजड हे भान नोहे स्वभावें


येशी वंशा क्षितीविदितशा पुष्करावर्तकांच्या

इंद्राचा तू सचिव वरिशी वांच्छिल्या रूपरेषा

दुर्दैवी मी रमणिविरही आळवितो धनेशा!

अह्वेरावे खलऋण बरी सज्जनांची उपेक्षा


तप्तांचि तू कणव जलदा, प्रीतिसंदेश नेई

स्वामीक्रोधे सखीविलग मी पोळतो येथ पाही

यक्षेशाच्या नगर अलके जा जिथे हर्म्यकेंद्रे

बाह्योद्यानी हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे


वातारूढा बघतिल तुला कुंतलाग्रेकरानें

उंचावोनि पथिकवनिता स्निग्ध आश्वासनानें

तू येता रें कवन विरही विस्मरेल प्रियेला?

माझ्या ऐसा खचित न कुणी दास होऊनि ठेला


संथे पंथे स्ववश पवनासंगती चालताना

वामांगाने घुमतिल तुझ्या चातकानंद ताना

गर्भाधानस्मृति उमलुनी व्योमलेखा बलाका

स्वांगें बंधो रचितिल तुला कंठरेखा सुरेखा


अंती तूतें खचित वहिनी एकनिष्ठा दिसेल

वेळोवेळीं दिन गणुनि जी सावरी जीववेल

स्त्रीचे प्रेमी हृदय विरहीं पुष्पसें ये गळाया

आशाबंधा वरिच बहुधा लागते सांवराया


आळंब्यांनी फुलवुनि करि सुप्रसू जो धरेतें

त्या त्वद्घोषा श्रवणसुभगा ऐकुनि फुल्ल चित्तें

पाथेयाला विसकिसलयें घेतले मानसाथी

कैलासान्ताप्रत तुज नभी हंस होतील साथी


आलिंगोनी जिवलग गिरी तुंग हा नीघ, भद्रा!

अंकी ज्याच्या रघुपतिपदें रेखिल्या वंद्य मुद्रा

जेंव्हा जेंव्हा विरह सरुनी त्या मिळें भेट तूझी

ढाळी तेंव्हा गहिवरुनी तो आंसवे उष्ण ताजीं


आधी ऐके सुखद तुज जो मार्ग सांगेन सोपा

त्यामागोनी परिस जलदा! श्राव्य माझ्या निरोपा

घ्यावा पंथी श्रमुनी शिणतां शैलशृंगी विसावा

स्रोतींचा नी कवळ हलका भागतां आकळावा


नेई वारा गिरिशिखर का या भ्रमे सिद्धमुग्धा

देखो जाता मुख उचलुनी विस्मिता नेत्रबद्धा

जा वेतांचे वन लुपुनि तूं लीलया उत्तरेतें

शुंडाघाती चुकवुनि सवें मानिल्या दिग्गजांतें


वाल्मीकाग्राहुनि मिसळुनी कोवळे रत्नराग

वाटे ये हा वर उसळुनी इंद्रचापांग भाग

तेणे श्यामा तनुस तुझिया लाभुनी ओप खूप

पिच्छें ल्याला दिसशील दुजा विष्णुसा गोपरूप


भूलीला ज्या कृषिवलवधू नेणती कांहि जात्या

भोळ्या भावें तुजसी बघता आर्जवे अन्नदात्या

मालक्षेत्रीं चढुनि कसिल्या गंध भूमीवरून

डावा थोडा वळुन झणिं जा उत्तरेला निघून


मार्गी दावानाल विझवुनी पावतां क्लेश कष्ट

आनंदाने धरिल तुजला मस्तकी आम्रकूट

आल्या मित्रा मुख न चुकवी क्षुद्र ही पांग फेडी

या थोराची किति मग कथूं स्नेह-आतिथ्य-गोडी


पक्वाम्री जो भरुन उजळी अंग अंगी सुवर्ण

तत्शृंगी तू बसशिल जधीं स्निग्ध केशांगवर्ण

पृथ्वीचा त्या स्तन समजुनी रम्य कृष्णाग्र गौर

स्वर्गीची रे अमरमिथुनें तोषवीतील नेत्र


जेथें कुंजी रमति शबरी स्वल्प तूं थांब तेथ

वर्षावान्ती त्वरित पुढचा लंघुनी जाई पंथ

वारे विंध्याचलपदि दिसे अश्मखंडे विशीर्ण

भासे फेनें करिवरिल जी पत्रवल्ली प्रसन्न!
Comments

 1. आज जरा मनासारखे नाही लिहिता आले. पण आजचा मुहूर्त साधायचा म्हणून लिहिले! फारच वाईट नाही झाले! पण तरी...

  असो, धन्यवाद मित्रा!

  ReplyDelete
 2. घाईत लिहिलेले एवढे सकस आणि दर्जेदार असेल तर सवडीने लिहिलेले कसे असेल बरे?? :O :O :)
  कालिदास, बा.भ. आणि हेमंत राजोपाध्ये तिघानाही सलाम... :) :)

  ReplyDelete
  Replies
  1. घाईत लिहिलेले एवढे सकस आणि दर्जेदार असेल तर सवडीने लिहिलेले कसे असेल बरे??
   कालिदास, बा.भ. आणि हेमंत राजोपाध्ये तिघानाही सलाम... :) :)>>>

   agadi agadi. mazya manatil vakye. :-)

   Delete
  2. घाईत लिहिलेले एवढे सकस आणि दर्जेदार असेल तर सवडीने लिहिलेले कसे असेल बरे??
   कालिदास, बा.भ. आणि हेमंत राजोपाध्ये तिघानाही सलाम... :) :)>>>

   agadi agadi. mazya manatil vakye. :-)

   MAZYAHI!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

   Delete
  3. जस गवयाचे पोर रडले तरी सु्रात रडते तसेच हेमंतच्या बाबतीत. हेमंत सारख्या व्यासंगी पंडिताने घाईत घाईत लिहीलेलं सुद्धा छान साहित्यिक गुणधर्म घेऊनच उतरतं. :-)

   Delete
  4. धन्यवाद अपर्णाताई आणि प्रशांत!

   Delete
  5. Varil pratisadanshi agadi sahamat aahe.
   Hemu, masta watale vachun. Lihit raha asach.

   Delete
 3. घाईत का असेना पण जे लिहिलं आहेस ते उत्तम... तसा आषाढ माझाही आवडीचाच...

  ReplyDelete
 4. अपेक्षित... सुंदर आणि दर्जेदार... शुभेच्छा भावा.

  ReplyDelete
 5. वाचले ... खूप आवडले.... ब्लोग्स मधे दर आठवड्याला नवीन, सकस, चांगले वाचायला मिळेल यात शंकाच नाही.
  .
  "दर आषाढ-प्रतिपदेला 'कालिदास' नावाचं गारुड मनाला हुरहूर लावतं...सोडत नाही"

  पण कधी तरी काही दिवसांकरता लेखन विराम घेतलात तर मात्र मी म्हणेन ....
  " 'हेमंत' नावाचं गारुड मनाला हुरहूर लावतं...सोडत नाही "
  .
  .
  आता "घाईत लिहिले" याबद्दल दोन शब्द ..
  .
  जर्मनीत सर्व उत्तम गोष्टी ठरवून होत असल्या तरी कित्येक चांगल्या गोष्टीची निर्मिती spontaneously होत असते. ठरवून मनासारखी निर्मिती होईलच असे नाही ...
  .
  आकाशात ठरवून वीज चमकत नाही ... आणि महाराष्ट्रात ठरवून वीज निर्मित होत नाही.
  .
  महाराष्ट्र सरकार करता अधिकृत शिवचरित्राचा श्रीगणेशा महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या हातून झाला नाही ... असो ...
  .
  जे झालंय ते उत्तमच झालंय ... मुद्दाम मनाला लावून न घेणे .... हलकेच घ्या ...
  .
  [ महामहोपाध्याय याचे नाव मी का घेतले हे समजले असेलच.... हे मात्र जड घ्या ]

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहाहाहाहाहा :D <>

   भारी होतं हे!
   धन्यवाद काका!

   Delete
 6. शुभेच्छा आणि अभिनंदन महा-महोपाध्याय जी !

  ReplyDelete
 7. प्रिया हेम्या तुझ्यासारख्या प्रतिभावान व अभ्यासू लेखकाकडून बऱ्याच अपेक्षा बाळगतो.मला कालिदासाच्या विवध साहित्याचा तुझ्या शैलीतील अनुवाद(adaptation of the essence) वाचायला नक्कीच आवडेल.प्लीज जमल्यास पद्यापेक्षा गाद्यावर भर दे व साधी सोप्पी भाषा वापर (नाहीतर लिहिलेला सगळा डोक्यावरून निघून जायचं आणि वाचनाची मजा निघून जाईल!!!)
  best of luck!!!

  ReplyDelete
 8. हेमंतवा तोहर ब्लोगवा को "Follow" बटन नाही हय रे! हमको update कैसे आयेगा? :P

  ReplyDelete
 9. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 10. Khup mast Hemant. Arthat tu nehami ch chhan lihitos. Keep it up dada !!!

  ReplyDelete
 11. आषाढस्य प्रथमदिवस:!..महाकवि कालिदास दिनाच्या मेघशुभेछा!..'पूर्वमेघ'नित्यानुरूप अप्रतिम!..

  ReplyDelete
 12. हेम्या, फ़ॊंण्ट साईझ जरासा वाढवता आला तर बघ,,,,(जागा फ़ुकटच आहे!)

  ReplyDelete
  Replies
  1. खरंय हेमंत, जरा फॉंट साईझ मोठा कर म्हणजे सगळ्यांना विनासायास वाचता येईल.

   Delete
 13. अप्रतिम... "आषाढस्य प्रथमदिवसः ..."मी उद्या वाचील असे ठरवून बाजूला झालो आणि काल रात्री माझी आई मला म्हणाली तुला माहित आहे काय आज काय आहे? म्हंटले नाही...ती म्हणाली "आषाढस्य प्रथमदिवसः "आज कालिदासाला आठवण्याचा दिवस..अग म्हंटले आमच्या हेमंत भाऊ ने पण आजच हा शब्द वापरलाय आणि लिहायला सुरुवात केली आहे...काय योगायोग म्हणावा..खूप भारी वाटले तिला.

  ReplyDelete
 14. आयला भारी पाठांतर आहे तुझं. अभिनंदन आणि शुभेच्छा ! !

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

फेसबुकावर टगे-सोयरे

कशासाठी? देशासाठी... दोन-हजारी नोटांसाठी...