Posts

Showing posts from December, 2012

फेस्बुकाचा फोलपणा

जाणुन घ्या हो फेस्बुकाचा फोलपणा
फिरून-फिरुनी पृथ्वीचा हा गोलपणा|
हौशा-नवशा-गवश्यांसाठी नवलाई, बोलबच्चनी मतांत शोधा थोरपणा||
आस्तिक-नास्तिक तत्त्वविदांची गर्दी अन्, अमूल्यशा वेळेचा मातीमोलपणा||
अनर्थाप्रतिलोकशाहिनेतात इथे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा घनघोरपणा||
भले प्रगल्भहि लेव्हल सोडुनि बडबडती,  विसरुनिया जाणीवांचा सखोलपणा ||
इथे शॉट डोक्याला लाउन घेऊ नये, केवळ चुत्त्येगिरी टवाळखोरपणा ||
उथळ जरी पाणी इथले परि समुद्र हा, काहि मोजक्या बेटांपाशी खोलपणा||
अफाट प्रतिभा लोकशक्ति जरि दिसत इथे, आंतरजाली त्याला कवडीमोलपणा||
कळले जरी हे व्यसन पूर्णत: ना सुटते, उसंत काढून करितो बडबडबोलपणा|| 
बोललो परी ऑनलायनी येइन मी, शब्दांचा हा केवळ गोलमटोलपणा|| 
परी पायरी फे.बू. सुटण्याची पहिलि, हाची या कवितेचा अन् अनमोलपणा||

करुणरस..

Image
भावना घेतल्या उसन्या तेव्हा तिथुनी, मोजले किती क्षण रंगविलेले इथुनी, वेंधळा हिशेबी उधळित जातो पैसा, बाजार भावनांचा उठतो मग ऐसा...

रंगविलेल्या स्वप्नांचे काय करावे? भंगल्या चित्रचौकटींत काय बघावे? विरल्या रंगांवर नवे रंग सजतील.. अन् त्याच चौकटी मिरवाया धजतील...

इंद्रायणीत विरल्या रंगांची गाथा, तीरावर तुकवुन भग्नहृदय हा माथा, रे काळ बदलला! गाथा नाही तरली, तुकयाची गाथा विरघळून अन क्षरली...

ओंजळीत केवळ गढुळ स्मृतींचे पाणी, कंठात घोगऱ्या, अभंग-भंगित गाणी, मुंडासे सुटले, फुटला अन तंबोरा, चिपळ्यांत अडकल्या, तुटल्या अन् त्या तारा...

व्यापारामध्ये साफ बुडाला वाणी, सावळ्या रुपावर लिहिली भावुक गाणी, वीट ही जागची नाहि तशी थरथरली, ती पूर्वीची भक्तीहि तशी न उरली...

भ्रष्टला तसा तो अन् ठरला बाजारी, प्रतिदिनी नवनव्या गावांची अन् वारी, धंद्यात बुडालेल्याला कसला थारा? भिंतिशी रात्रभर थंड बोचरा वारा...
धाबळी अंथरू? पांघरून वा घेऊ? हे अन्न शिळे खाऊ की टाकुन देऊ..? तापवू कसे पाणी? हे फुटके पात्र, हे प्रश्न सोडवित निघून गेली रात्र...

विसरली जुनी गाथा, विस्मरली वीट, जरि इंद्रायणि भरली अन् काठोकाठ,
भरली यात्रा लाखोंनी, भरला रंग, कानावर त्…

थंडीतली ही जर्मनी...

Image
धवळाळली बर्फाळली ही शुभ्र झाली जर्मनी, हे गोठले जन-जीव अन् ही स्तब्ध झाली जर्मनी...
'हे बर्फ की हा वर्ख?' या कोड्यात गुंग हि जर्मनी, पिंजारल्या बर्फात रंगुनि दंग झाली जर्मनी...
धुक-दाटली पांढुरली मेघाळली ही जर्मनी, हिमवृष्टिने पिठुराळली पेंगाळली ही जर्मनी...
बेधुंद त्या मदिरेसवे प्रणयात रंगे जर्मनी, या शिरशिऱ्या थंडीत वाऱ्यावर तरंगे जर्मनी...
पांढूरक्या रात्रीतुनी चकचककते ही जर्मनी, बर्फातुनी अन् मार्ग काढत जाइ पुढती जर्मनी...
छोट्या वीरांच्या खेळण्याने स्निग्ध झाली जर्मनी, स्नो-मेनच्या त्या आकृत्यांनी भरुनि गेली जर्मनी...
नाताळच्या माहौलने मंत्रून गेली जर्मनी, त्या उष्ण पेया-व्यंजनांनी तृप्त झाली जर्मनी...
मऊशार दुलईतून साखरझोप घेते जर्मनी, वाफाळल्या कॉफीसवे उत्साहते ही जर्मनी...
ग्योटिंगेन ख्रिसमस-मार्केट
स्नो-मन माझ्या घराच्या खिडकीतून..