करुणरस..

भावना घेतल्या उसन्या तेव्हा तिथुनी,
मोजले किती क्षण रंगविलेले इथुनी,
वेंधळा हिशेबी उधळित जातो पैसा,
बाजार भावनांचा उठतो मग ऐसा...


रंगविलेल्या स्वप्नांचे काय करावे?
भंगल्या चित्रचौकटींत काय बघावे?
विरल्या रंगांवर नवे रंग सजतील..
अन् त्याच चौकटी मिरवाया धजतील...


इंद्रायणीत विरल्या रंगांची गाथा,
तीरावर तुकवुन भग्नहृदय हा माथा,
रे काळ बदलला! गाथा नाही तरली,
तुकयाची गाथा विरघळून अन क्षरली...


ओंजळीत केवळ गढुळ स्मृतींचे पाणी,
कंठात घोगऱ्या, अभंग-भंगित गाणी,
मुंडासे सुटले, फुटला अन तंबोरा,
चिपळ्यांत अडकल्या, तुटल्या अन् त्या तारा...


व्यापारामध्ये साफ बुडाला वाणी,
सावळ्या रुपावर लिहिली भावुक गाणी,
वीट ही जागची नाहि तशी थरथरली,
ती पूर्वीची भक्तीहि तशी न उरली...

भ्रष्टला तसा तो अन् ठरला बाजारी,
प्रतिदिनी नवनव्या गावांची अन् वारी,
धंद्यात बुडालेल्याला कसला थारा?
भिंतिशी रात्रभर थंड बोचरा वारा...
धाबळी अंथरू? पांघरून वा घेऊ?
हे अन्न शिळे खाऊ की टाकुन देऊ..?
तापवू कसे पाणी? हे फुटके पात्र,
हे प्रश्न सोडवित निघून गेली रात्र...


विसरली जुनी गाथा, विस्मरली वीट,
जरि इंद्रायणि भरली अन् काठोकाठ,
भरली यात्रा लाखोंनी, भरला रंग,
कानावर त्याच्या गाथेतील अभंग...

थिरकले पाय अन् टाळी आपोआप,
ज्ञानया तुकोबा अन् रखुमावर बाप..
पालखी तयाची, त्याला तुडवुन जाय,
पादुका वाहणाऱ्यांचे झपझप पाय... 

गाजेल कधितरी त्याची छापिल गाथा,
पादुकाहि झिजतील टेकवून अन् माथा,
परि स्वप्ने त्याची उधळुन, भंगुन गेली,
पण निर्माल्यावर नव्या नव्या फुल-वेली...

त्या भ्रष्ट भावना आणि तिचे कैवारी,
निष्ठूर काळ अन् सुख-स्वप्नांच्या झारी,
का हरवुन, तुटुनी, फुटुनी अवघ्या पडल्या?
प्रश्नांच्या फैरी आत्म्यावरहि झडल्या...

आजही भटकतो भेसुर घाटावरती,
दिसतो कुणास म्हणती , त्या सेतुवरती,
ना तेल मागतो, झपाटतो ना बाध,
गाथेच्या अवशेषांचा..घेतो शोध...


Comments

 1. Hemant he apan ka lihile ahey uchcha darjache un gahan ani doliya ghatale anjan mhanawe lagel

  ReplyDelete
 2. Ashwaththaamaa in the end is a nice touch..
  btw did u take that pic? where is this location?

  ReplyDelete
 3. This place is Sant Tukaram Gatha Mandhir, Dehu Road - Indrayani Kaath.

  ReplyDelete
 4. ____/\____

  अफाट अचाट अथांग
  पुन्हा पुन्हा वाचते आहे

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

फेसबुकावर टगे-सोयरे