आम्ही कोण...?

आज, दिनांक २७ ऑगस्ट २०१२च्या लोकसत्तेत आलेल्या लेखावरून प्रेरित होऊन झालेले केशवसुतांच्या कवितेचे विडम्बन! खूप दिवस हा विषय डोक्यात होताच.. आज ह्या संपादकीयामुळे किल्ली बसली, आणि एकटाकी लिहून काढलं ते इथे पोस्ट करतो ! 
'प्रस्थापित म्हणवून घ्यावे लागणाऱ्या' समस्त सरकारी सारस्वतांप्रत समर्पित

आम्ही कोण म्हणोनि काय पुससी ह्या अग्रलेखातुनी ?
श्रोत्यांनी जग व्यापिलेच अवघे आम्हांस भटकायला,
विश्वी राजकवींपरि विचरतो सर्वत्र हो लीलया
      सरकारातुनी कार्यभार मिळवू आम्ही 'महामंडळी'*,
       सारा हि बडिजाव येथ मिरवू, उचलू 'टग्यांची' तळी
'पाणि'स्पर्श हि राजकारणि महानेत्याकडुन् मागुया
''मोठाले अनुदान?'', ते हि मिळवू; संमेलनालागि या   
        फोले पाखडिता क्वचित् दिसतसे नि:स्वार्थी आम्हांमध्ये
        सारे काही मिळोनि हो दळिदरी आम्हीच विश्वामध्ये
कोट्यातून न लाभले घर असा; वा लाभ कसला उगी; 
'एस्.टी.-ट्रेनमधूनी त्या सवलती ना घे असा' ना जगी
        'लाभे स्वास्थ्य न' हे म्हणौनी प्रतिभा ती पाजळू, श्रेष्ठता      
          आणू या जगतीतळी फिरवूनी आदीम ती नग्नता  
शोधू अड्गळीं त्या नव्या नि शिकवू पृथ्वीस् मूल्ये नवी     
'आहे त्यातहि फाटके' हुडकण्या चाणाक्ष दृष्टी हवी
           आम्हाला वगळा; कशी घडति हो विश्वात ह्या भांडणे?  
            दुष्काळा वगळा, जगी भरवूया मोठ्ठाली संमेलने||     
                                                                              -बेचवभूत


*'महामंडळी' हे रूप प्रथमा व सप्तमी अशा दोन्ही विभक्तीत आहे हे जाणकारांस सांगणे न लगे!

Comments

  1. निव्वळ अप्रतिम !!!!!

    ReplyDelete
  2. अप्रतिम ... आवडले .... केश्वसुतांपेक्षा सहज सोपे आहे.
    .
    थोडे विषयांतर ...
    संपादकीयामुळे जर किल्ली बसत असेल तर 'की चेन' पाठवून देतो....
    .
    तसेच बाबासाहेब पुरान्दार्यांच्या संपर्कात रहा.... शिवरायाच्या काळात, किल्यांची कशी निगा ठेवली जायची याचे ते मार्गदर्शन करतील ... जेणेकरून सतत वाढणाऱ्या किल्यांच्यी सोय करणे कठीण जाणार नाही.
    .
    .

    ReplyDelete
  3. Replies
    1. मस्तच.....हे बेचवभूत...याची बाधा कशी स्वतःला करून घ्यावी?????

      Delete
  4. आवडले..सांगायलाच नको..."श्रोत्यांनी" आणि "वगळा" यातली सहजता विशेष!सांगायाचे इतके नि असे ...तेव्हा सलगतेने हे जमणे सोपे नाही ..मान्य!
    विडंबनात कसरत मुआफ तशी.
    ताबडतोब "बेचवभूत"चा कॉपीराईट घेऊन टाक.
    वैभवला म्हणावं बाधा होईल आपोआप!"इतके" प्रश्न कशाला?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पूर्वमेघ

जय हो...

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)