श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

अखिल महाराष्ट्र-भूमीतील लोकांची क्षुधा शमविण्याचे महत्कार्य करणारा वडापाव म्हणजे आमचा जीव की प्राण! गेल्या एक वर्षापासून दूर युरोपातल्या एका शहरात राहत असताना कुटुंब, मित्र, सह्याद्री, आणि आमची प्राणप्रिय अशी पुरणपोळी ह्यांच्यासोबतच आम्ही सर्वात जास्त मिस करत असू तो हा वडा-पाव!  मध्यंतरी आम्ही स्वयंस्फूर्तीने बटाटवडे करायचे काही यशस्वी प्रयोग केले! त्याच प्रयोगांच्या वेळी कराव्या लागलेल्या करामतींचे व 'वडापाव' या व्यंजनाचे धार्मिक, पारलौकिक व सामाजिक औचित्य अगदी आपल्या रोजच्या बोलीभाषेत पटवून देण्याचा हा वृत्तबद्ध प्रयत्न!


वृत्त: शार्दूलविक्रीडित, (चाल : रामो राजमणि: सदा विजयते) 


वीकेंडी दरवेळि मी ठरवतो खावे बटाटेवडे,
ओल्या नारळ-मिर्चिची चटणिही त्याच्या सवे आवडे,
फाडूनी मधुनी मऊसर असा तो पाव बेक्रीतला,
खाऊया चविने असे म्हणिन तो, पाणीच जिह्वा-तला*[१]||             

ऐसे हे ठरवोनि मी निघतसे पेनी-रिआलच्या[२] दिशे,                 
कांदे आणि बटाट-कंद पिशवीतूनी आणाय्च्या मिषे,
आणोनी, धुवूनी तयां नळ-जले शिज्वितसे कूकरी
शिट्ट्या कर्णपथीही चार पडती शिज्ताच हॉट्-प्लेट्वरी 

काढोनी कुकरातुनी शिजविलेले ते बटाटे तसे,
सोलूनी नख वापरून हलके सालींस डस्ट्-बिन् दिसे,
त्यापश्चात करोनि smash झणि ते सारे बटाटे बडे,  
कोथिंबीर-आले-लसूण-मिरचीची पेस्ट आयती पडे

हे सारे करता तयाच समयी हलकी जिरा-फोडणी,
घालोनी उपरोक्त मिश्रणि जरा, त्यां कालवोनी झणी,
छोटे गोल करोनि, दाबुनि तयां दोन्ही हातांच्यामध्ये,
किंचित् त्यां पसरट् वड्यांपरि करून् ठेवीत ताटामध्ये

आता शोधुनि पात्र ते झळळते स्टेन्लेस स्टिलचे खणी[२],                
डाळीचे पिठ, हिंग आणि हळदीची त्यात भर् घालुनी 
थोडे लाल तिखट् तसेच प्रिय तो ओवा जरा लागतो,
सोडोनी नळ उष्ण पाणि जपूनी त्या मिश्रणी घालतो

आता ऐक महत्त्वपूर्ण सहजी ही 'टीप' मी देतसे,
थोडे तप्त असेच रे कढतसे ते तेल लागीतसे,
ते घेवोनि पिठात अन् मिसळतो 'आई जसे सांगते', ;)
तत्पश्चात् चमचा धरोनि स्वकरे ढवळावया लागते

त्यावेळी कढईत तप्त कळते झाले पहा तेल ते,
घेवोनी करि ते वडे बुडवुनी पीठात घोळूनि ते,
पश्चात् ते तळतो करोनि हलकी मंद-प्रखर् हॉट-प्लेट्, 
घाणे काढू तळून योग्य तितुके खाण्या वडे आणि थेट्

किंवा हो करि पाव घेउनि तया फाडोनि मध्यातुनी,
घालोनी चटणी, यथेच्छ नि  वडा त्याच्यामध्ये ठेउनी,
मिट्क्या मारत खाइ मी निजकरे विसरोनि दिक्-काल ते,
आनंदे लहरी अशा उसळती जेव्हा तुम्ही खाल ते

'अन्नं ब्रह्ममयम्' म्हणोनि वदती शास्त्रे-पुराणे-मते,
ते हे ब्रह्मचि दीन-तारण कराया अन् भुवि पावते, 
पक्वान्नांतुनि सोवळ्या नि भरल्या मुद्पाकखान्यामधून्,
गाड्या अन् टपऱ्यांवरी अवतरे साध्या जनांलागि अन् 

ऐसे हे प्रिय अन्न खाति सगळे रंकासवे राव ही,
साऱ्या भेद-मतांस दूर करतो धन्यू वडा- पावही,
त्याची रेसिपि आज येथ कथिली जिज्ञासु लोकांप्रति,
खावोनी शमवावि क्षुद्[४] बहु-जने[५] मिळवावया सद्गती                            
[1]जिह्वातल: जिभेचा पृष्ठभाग
[२]पेनी-रिआल: पेनी, रिआल ही माझ्या घरासमोरची दोन मोठी सुपर-मार्केटस् आहेत. युरोपात ह्या दोन कंपन्यांची मोठी चेन आहे.         
[३]खणी: कप्प्यात
[४]क्षुद्: भूक
[५]बहु-जन : ही कुठलीही जातीय/राजकीय संज्ञा नाही. बहुत जन असाच याचा अर्थ घेणे!  


Comments

 1. अप्रतिम आणि चविष्ट...!!!

  ReplyDelete
 2. खास आजीच्या वापरातला शब्द आठवला - "खादाड-कुर्कुला" !!!

  ReplyDelete
 3. जमुन गेलीय रेसिपी! भूक लागली लेका! आता दे वडापाव!

  ReplyDelete
 4. Ekadaam Khaas... Aavadya apaneku..

  ReplyDelete
 5. Inspired by 'Keshavsumar'? ;)

  Chintamani

  ReplyDelete
 6. मस्त! झकास! कविता आवडली.

  ReplyDelete
 7. अब तो एक वडापाव बनता है आज...

  ReplyDelete
 8. फक्कड जमलाय मेन्यु .....
  लई भारी

  ReplyDelete
 9. वा, हा बटाटा वडा फारच झकास आहे :) लगे राहो !!

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फेसबुकावर टगे-सोयरे

आभाळाएवढा मोठा माणूस: प्रा. राम बापट सर