फेसबुक-अडिक्ट पिशीमावशी


भारतात गेल्यापासून एकुणात ऑनलाईन कमीच होतो! तिथे बरीच भटकंती झाल्यावर पुन्हा इथे आलो आणि फेस्बुकावर, जी-मेलवर एक्टिव्ह झालो. ब्लॉगावर काहीही न लिहिल्याची जाणीव मनाला खात असतानाच हि बया, पिशी आठवली! साधारण एक वर्षापूर्वी डोस्क्यात आलेली ही पिशीसुद्धा जालावर यायला उतावीळ झाली. आता तिला 'नाही' म्हणणं अवघड आहे. 

घ्या, झेला या पिशीला!  


कितेक दशकांच्या झोपेतुन,
पिशी मावशी जागी झाली,
जागी होऊन 'हर्षो'न्मीलित
रसिक-हृदातून पिंगा घाली||१||

अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'-
-तुनी प्रकटली 'कृत्ये'मधुनी,
आज पुन्हां संजीवन लाभुन
डोकावित ही अधून-मधुनी ||२||

मात्र टिकोनी आहे बर का
तिचा तोच तो खट्याळ नखरा!
मानगुटीवर बसुन लिहविते
हर्ष मनातुन रसिकास खरा||३||

थयथयाट तो तसा होऊ दे
पिशे;मनातुन पुन्हा अमुच्या,
जागव पुन्हा अल्लड, हुल्लड
आठवणी त्या जुन्या कालच्या||४||

आता पिशे तू उडाणटप्पू
पुन्हा-पुन्हा ये भेटायाला,
फेसबुकावर टगे-सोयरे
सज्ज तुला हे खेटायाला ||५|| 

पिशी मावशी बर का कळले
शाप तुला माती खाण्याचा,
थिल्लर रेघोट्या-चाळ्यांनी
कॉमेंट्-संख्या वाढविण्याचा||६|| 

फोन घेउनी भुताट समयी, 
झपाटावाया पिशी निघाली,
फोनवरोनी शीव्या खाऊन
रोजच्यापरी कृतार्थ झाली||७||

आता सारे जाणून सावध
पिशे तुझा हा लबाड बाणा,
उपवासाला चिकन तर्रिच्या 
सोबत खातेस् साबूदाणा ||८||

जेव्हा कळले सर्वजणांना;
लबाड खोटी पिशी पळाली
ओठ तिचा चाचप्णाऱ्याच्या
हातून तीची मिशी जळाली||९||  

इकडे कळले भूत्यास जेव्हा
फ्रेंड-लिस्ट ही झाली शंभर |
जाणुनी इतुके ठेंगू झाले
चिटुके त्याला त्याचे अंबर ||१०||

मत्त विहरण्या पिशीस सोडून
यंत्रपिशाच्च्या स्नेही करतो,
Laptopला वीज पुरवुनी,
चैतन्याने देही करतो||११|| (देही-सजीव )

त्याच शॉकने परि थरथरिसी,
कशास गे तू पिशी मावशी?
यंत्रयुगातून सुटका लाभुन
सद्गतीस तू खरी पावशी ||१२||

भूत्यास नाही पिशी बघा हो
पिशीस नाही भुत्या राहिला,
पिशाच्च-मेळ्याने वियोग हा
तटस्थतेने बघा साहिला ||१३||

अशा पिशीचे कौतुक गाता, 
हर्षभरित पिशि प्रसन्न होई,
हळूच येऊन स्वप्नामधुनी
गालावरती चुंबन देई ||१४||

शंभर लाईक्स देऊनी ह्यावर
आम्ही जेव्हा कॉमेंट करतो;
HACKकरोनी अकाउंट मग 
भुत्या मानगुट आमची धरतो||१५||

केवळ आता लॉगाउटचा
ऑप्शन एकमात्र हा उरला;
पिशी-भुत्याचा मी गेल्यावर
पहिला डेटिंग-टाईम ठरला ||१६||   


 -हेमंत

आमची आणि विंदा करंदीकरांच्या पिशीची पुन्हा नव्याने संस्मरणीय ओळख करून देणारे काव्योन्मत्त 'पिशा'च्च वृत्तीने राहणारे आमचे प्रेरणास्थान मित्रवर्य हर्ष परचुरे यांना समर्पित!

Comments

  1. धन्यवाद देवा ! तुमच्याही मानगुटीवरून ही उतरेल असे दिसत नाही एकंदरीत ;)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

फेसबुकावर टगे-सोयरे

कशासाठी? देशासाठी... दोन-हजारी नोटांसाठी...