इतिहासाचं वर्तमान-भविष्य!!

आज ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ.ब्रह्मानंद देशपांडे गेल्याची दुर्दैवी बातमी आली!! संस्कृताभ्यासक डॉ. प्र.शं. जोशी (डॉ.आंबेडकरांच्या देदीप्यमान आयुष्यावरील 'भीमायन' या महाकाव्याचे कर्ते), डॉ.शि.द. जोशी (विख्यात वैयाकरण) अन् डॉ. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर (मराठी व्याकरणकार, संस्कृतपंडित व कवी) या थोर प्राच्यविद्यापंडितांच्या एका पाठोपाठ एक जाण्याने झालेलं दुःख अधिकच गडद झालं! तसं साधारण एकाच वयाची, पंच्याऐंशी-नव्वदच्या आसपास वय असणारी ही मंडळी! आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेल्या ह्या अभ्यासकांकडून कधीनाकधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिकण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. त्यांच्या जाण्याचं दुःख हे अगदी आप्तस्वकीय गमावल्याचंच दुःख!

हल्लीच्या काळात अभ्यास क्षेत्रात; त्यातही इतिहास-भाषा क्षेत्रात घुसलेल्या, राजकारण्यांना जातीय व्होटबँक मिळवून देण्यासाठी तत्पर असलेल्या, एकास एक 'सर' अशा स्वयंघोषित, भुरट्या, 'अभि-जात'वादी 'अभ्यासकां'(?)च्या वाढत्या उपसर्गाचे फेसबुकादि माध्यमांतून होणारे उन्मुक्त प्रकाशन आणि छछोर, अॅकॅडमिक शिस्त नसलेली, बुद्धिभेदजनक संशोधने बघून उपर्युक्त अभ्यासकांच्या जाण्याचं दुःख अधिक तीव्र भासू लागतं. अभ्यासक्षेत्रात घुसणारे हे चटोर लोक आणि त्यांच्यावरील राजकीय वरदहस्त पाहिले की मन विषण्ण होतं!! त्याच उद्विग्न अवस्थेत सुचलेल्या ह्या काही ओळी:


नक्षत्रमंडलातून एकापाठोपाठ एक निखळलेल्या तारकांनी 
आभाळाला विचारलं,​ ​
"बाबारे..!! आमच्या इतिहासाचं भविष्य ते काय?" 
आभाळ म्हणालं, 
"बाबांनो , सुखात जगा!! 
इथे आलाहात, आनंदात राहा!!
असले विचार सोडून द्या! खाली बघूही नका!! 
आणि हो, भविष्याचं काय घेऊन बसलात?
वर्तमानातच देशाच्या भाग्यविधात्यांच्या 
पाळीव पोपटांनी 
आपापल्या ब्लॉग्जच्या 
टॅरोकार्डांवर इतिहासाचे विदारक भविष्य मांडणे 
सुरु केले आहे!! 

आता, 
त्या तुमच्या अस्सल ज्योतिषांच्या नशिबी 
परप्रकाशी होऊन राहाणंही उरणार नाही, 
किंबहुना उरलेलंच  नाही...!!"


Comments

  1. वाव .. मस्तच .. !
    हेमंत तुमच्या प्रतिभेला सलाम !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पूर्वमेघ

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

जय हो...