रोमन इतिहासास...

मध्यंतरी इटलीला जाऊन दांते, मेकीयाव्हेली, मायकेल अँजेलो, गॅलिलिओ ह्यांची टोंबस् आणि त्यांची कला-ज्ञानसाधना 'याचि देही..' बघून आलो. वसंत बापटांचं मायकेल अँजेलोपनिषद इथे अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन अनुभवलं ! केवळ अद्भूत, अलौकिक..!! रोममध्ये भटकताना रोमन साम्राज्याचा, माझ्या आवडत्या ज्युलियस सीझरचा इतिहासही (पुलंच्या) 'हरीतात्यां'च्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला...!

प्रबोधनाच्या देशात जाऊन आल्यावर मर्यादा झिडकारून देण्याचं बळ मिळावं इतकं स्थानमाहात्म्य इथे आजही आहे..! 
त्यानिमित्ताने काही स्फुरलं, ते लिहिलंय..:
----------------------------------

हे भग्न खांब कलथले; उलथली मूर्ती,
भग्नशा भिंतितून साक्ष जुन्याची पुरती,
या साक्षींच्या शाहिरा गवसले काय..?
इतिहासासम वर्तमान घडतो हाय...!

तो शूर रणांगणि खुर्दा पाडुन गेला,
त्या क्रूर शत्रुचा मुर्दा पाडुन गेला,
एकछत्र तो स्थिर सत्ता देण्या जाई,
मित्रांनीही त्या जिते ठेवले नाही...!

हा भव्य असा इतिहास सांगुनी जाई,
मम चरित्र लिहिण्या रक्ताची हो शाई,
ते वाच-वाचुनी जबरदस्त अन् पगडा;
आकंठ माखुनी समाज तरिही उघडा...!

ही भव्य-भग्न मूर्ती अन् हुरहुर साहे,
'संचित माझेही अफाट हे जरि आहे;
शुष्कशी प्रेरणा मिळते मुर्दाडांना;
मातीतिल पायाचे परि भान न त्यांना...!'

विद्वान थोर इतिहासी झाले, गेले,
मर्द वीर ते काळाने रिचवुन नेले,
विद्वान-सभा अन् युद्ध जिंकणाऱ्यांनो,
पोवाडे तुमचे जातिल; विरुनी गेले...!

इतिहास चित्र-शिल्पांची का हो गर्दी?
इतिहास-पुरुष की रक्त-रंजनी दर्दी..?
जिंकिले, ह्यास मारिले, कापिले म्हणतो..
पश्चात्तापाने मूक वेदने कण्हतो...!

इतिहास असा; तर धर्म तसा सत्शील;
मूल्ये-नीती-ज्ञानाचा मिशीस पीळ;
"ते ज्ञान मुक्ती देते" म्हणती; पण हाय,
वास्तवात दंभाने मातवून जाय...!

हा भव्य देव-प्रासाद; घुमटही भव्य,
मानवता शिकवी मूर्ती निर्जिव दिव्य,
येथे भरल्या पोटी करुणेचा बोध;
कुठल्या अस्मानापलिकडच्याचा शोध...!

ती भव्य देवळे रेखिव चित्रित भिंती,
रेशमी झिरझिरी वस्त्रे; मिणमिण पणती,
त्या पुढे क्रुसावर देवपुत्र ना दिसतो,
तो खिन्न; दुरून झगमग डोळ्यांना हसतो...!

ओरपली त्याची करूणा भक्त-जनांनी,
समृद्ध जाहले आणिक तृप्त मनांनी,
''ना नको करू करुणा पुन्हा; ना वेड्या'',
सांगाया येती तुजला तुझिया खेड्या...!

''तू व्यर्थ फुकाचा क्रुसावरी चढलास,
अन् व्यर्थ दयेने गरिबांच्या रडलास'',
'एकटा दरिद्री रोड काय करणार..?'
ही..हीच समीक्षा तव चरित्र सहणार...!

का घडली येथे थोर-चरित्रे दिव्य ?
का सर्वस्पर्शि इतिहास घडावा भव्य..?
नाही येथे ह्याचा हो लेखा-जोखा,
चिरफाड्या विद्वानांचा येथे धोका...!

हे असेच सगळे युगायुगी घडणार,
पाण्याने भरले घट रितेच होणार..
निर्मळ जे मिळते पाणी; पिउनी जावे,
विश्वास्तव जितुके शक्य त्यातुनी द्यावे...!

सिस्टाईन चॅपलमधील एक कक्ष

ज्युलियस सीझरची हत्या झालेले स्थान 

कलावंतांचे तीर्थक्षेत्र... Piazza Michelangelo, फ्लोरेंस! डिव्हाईन कॉमेडीचं लेखक 
दांते, मायकेल अन्जेलो, मेकीयाव्हेली, गलीलीयो..रोसिनो.. ह्या सर्व दिग्गजांच्या समाध्या


Basilica di San Pietro in Vaticano सेंट पीटर्स चर्च..! 

कॅथोलिक ख्रिस्ती धर्माचे मुख्य धर्मपीठ...!


Comments

  1. फारच छान झालंय हे काव्य. मलाही हे असेच वाटले होते तिथे गेले होते तेव्हा. पुनःप्रत्ययाची अनुभूति दिलीस.

    ReplyDelete
  2. फारच छान झालंय हे काव्य. मलाही हे असेच वाटले होते तिथे गेले होते तेव्हा. पुनःप्रत्ययाची अनुभूति दिलीस.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पूर्वमेघ

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

जय हो...