Posts

Showing posts from 2012

फेस्बुकाचा फोलपणा

जाणुन घ्या हो फेस्बुकाचा फोलपणा फिरून-फिरुनी पृथ्वीचा हा गोलपणा| हौशा-नवशा-गवश्यांसाठी नवलाई, बोलबच्चनी मतांत शोधा थोरपणा|| आस्तिक-नास्तिक तत्त्वविदांची गर्दी अन्, अमूल्यशा वेळेचा मातीमोलपणा|| अनर्थाप्रति   लोकशाहि   नेतात  इथे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा घनघोरपणा|| भले प्रगल्भहि लेव्हल सोडुनि बडबडती,  विसरुनिया जाणीवांचा सखोलपणा || इथे शॉट डोक्याला लाउन घेऊ नये , केवळ चुत्त्येगिरी टवाळखोरपणा || उथळ जरी पाणी इथले परि समुद्र हा, काहि मोजक्या बेटांपाशी खोलपणा|| अफाट प्रतिभा लोकशक्ति जरि दिसत इथे, आंतरजाली त्याला कवडीमोलपणा|| कळले जरी हे व्यसन पूर्णत: ना सुटते, उसंत काढून करितो बडबडबोलपणा||  बोललो परी ऑनलायनी येइन मी, शब्दांचा हा केवळ गोलमटोलपणा||  परी पायरी फे.बू. सुटण्याची पहिलि, हाची या कवितेचा अन् अनमोलपणा||

करुणरस..

Image
भावना घेतल्या उसन्या तेव्हा तिथुनी, मोजले किती क्षण रंगविलेले इथुनी, वेंधळा हिशेबी उधळित जातो पैसा, बाजार भावनांचा उठतो मग ऐसा... रंगविलेल्या स्वप्नांचे काय करावे? भंगल्या चित्रचौकटींत काय बघावे? विरल्या रंगांवर नवे रंग सजतील.. अन् त्याच चौकटी मिरवाया धजतील... इंद्रायणीत विरल्या रंगांची गाथा, तीरावर तुकवुन भग्नहृदय हा माथा, रे काळ बदलला! गाथा नाही तरली, तुकयाची गाथा विरघळून अन क्षरली... ओंजळीत केवळ गढुळ स्मृतींचे पाणी, कंठात घोगऱ्या, अभंग-भंगित गाणी, मुंडासे सुटले, फुटला अन तंबोरा, चिपळ्यांत अडकल्या, तुटल्या अन् त्या तारा... व्यापारामध्ये साफ बुडाला वाणी, सावळ्या रुपावर लिहिली भावुक गाणी, वीट ही जागची नाहि तशी थरथरली, ती पूर्वीची भक्तीहि तशी न उरली... भ्रष्टला तसा तो अन् ठरला बाजारी, प्रतिदिनी नवनव्या गावांची अन् वारी, धंद्यात बुडालेल्याला कसला थारा? भिंतिशी रात्रभर थंड बोचरा वारा... धाबळी अंथरू? पांघरून वा घेऊ? हे अन्न शिळे खाऊ की टाकुन देऊ..? तापवू कसे पा...

थंडीतली ही जर्मनी...

Image
धवळाळली बर्फाळली ही शुभ्र झाली जर्मनी, हे गोठले जन-जीव अन् ही स्तब्ध झाली जर्मनी... 'हे बर्फ की हा वर्ख?' या कोड्यात गुंग हि जर्मनी, पिंजारल्या बर्फात रंगुनि दंग झाली जर्मनी... धुक-दाटली पांढुरली मेघाळली ही जर्मनी, हिमवृष्टिने पिठुराळली पेंगाळली ही जर्मनी... बेधुंद त्या मदिरेसवे प्रणयात रंगे जर्मनी, या शिरशिऱ्या थंडीत वाऱ्यावर तरंगे जर्मनी... पांढूरक्या रात्रीतुनी चकचककते ही जर्मनी, बर्फातुनी अन् मार्ग काढत जाइ पुढती जर्मनी... छोट्या वीरांच्या खेळण्याने स्निग्ध झाली जर्मनी, स्नो-मेनच्या त्या आकृत्यांनी भरुनि गेली जर्मनी... नाताळच्या माहौलने मंत्रून गेली जर्मनी, त्या उष्ण पेया-व्यंजनांनी तृप्त झाली जर्मनी... मऊशार दुलईतून साखरझोप घेते जर्मनी, वाफाळल्या कॉफीसवे उत्साहते ही जर्मनी... ग्योटिंगेन ख्रिसमस-मार्केट स्नो-मन माझ्या घराच्या खिडकीतून.. 

श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

Image
अखिल महाराष्ट्र-भूमीतील लोकांची क्षुधा शमविण्याचे महत्कार्य करणारा वडापाव म्हणजे आमचा जीव की प्राण! गेल्या एक वर्षापासून दूर युरोपातल्या एका शहरात राहत असताना कुटुंब, मित्र, सह्याद्री, आणि आमची प्राणप्रिय अशी पुरणपोळी ह्यांच्यासोबतच आम्ही सर्वात जास्त मिस करत असू तो हा वडा-पाव!  मध्यंतरी आम्ही स्वयंस्फूर्तीने बटाटवडे करायचे काही यशस्वी प्रयोग केले! त्याच प्रयोगांच्या वेळी कराव्या लागलेल्या करामतींचे व 'वडापाव' या व्यंजनाचे धार्मिक, पारलौकिक व सामाजिक औचित्य अगदी आपल्या रोजच्या  बोलीभाषेत  पटवून देण्याचा हा वृत्तबद्ध प्रयत्न! वृत्त: शार्दूलविक्रीडित, (चाल : रामो राजमणि: सदा विजयते)  वीकेंडी दरवे ळि  मी ठरवतो खावे बटाटेवडे, ओल्या नारळ-मिर्चिची चटणिही त्याच्या सवे आवडे, फाडूनी मधुनी मऊसर असा तो पाव बेक्रीतला, खाऊया चविने असे म्हणिन तो, पाणीच जिह्वा-तला* [१] ||              ऐसे हे ठरवोनि मी निघतसे पेनी-रिआलच्या [२]  दिशे,                  कांदे आणि बटाट-कंद...

फ्रेश, आध्यात्मिक नवकविता

रातीच्या किर्र अंधारात कविता ऐकताना, मला आठवते ते झुरळ... झुरळाचे पंख आणि त्याची फडफड.. फडफडीतून आठवतो त्या भयाण कवितेतला प्रत्येक शब्द.. झुरळ अंगावरून फिरु लागले की आठवते ती त्या कवीची अंगावर येणारी कविता... मग मीच स्वतःला सावरतो, एखाद्या भेदरलेल्या रसिकासारखा.. आणि उडवून लावतो त्या झुरळाला.. एखादा भीषण, शब्दबंबाळ कवी समजून.. मग कळते ती कविता ही संसार-मायेतील एक छोटीशी लीला असल्याचे  आणि समजते की ह्या आनंदाची सुखद जाणीव आणि त्या कवितेचा शेवट ह्यांचे ऐक्य... हाच असतो ब्रह्मानंद... हाच असतो ब्रह्मानंद... -हेमंत राजोपाध्ये :D

जय हो...

पुन्हा एकदा नवी बातमी, पुन्हा एकदा आम आदमी पुन्हा एकदा पाळू मौन आणि जाऊ भाव खाऊन... पुन्हा मेणबत्त्यांची यात्रा, पुन्हा 'जंतर-मंतर', जत्रा! आणखी एका पुतळ्याचा भंग, आणि आमचा जातीय रंग...! पुन्हा एकदा छत्रपती हिरो गांधी? ह्यांच्या दृष्टीने ते तर झीरो, सावरकर तर दुर्लक्षित, आमी नाय कोनाला भीत...! फुले-टिळक-आंबेडकर, छत्रपती अन आगरकर..  तुमचे ते आणि आमचे हे जात-पात ? छे...! छे...! राजकारणी भिक्कारचोट ! जनता म्हणजे नकली नोट... तब्बल २६ पर-सेंट व्होटिंग, "साला नेता करतो चीटिंग !" आम्ही केले पेट्रोल स्वस्त, पुर्वीचा 'इंडिया शायनिंग' मस्त, धुवू कोळशाचे काळे 'हात', रामराज्य? ते तर  'बौद्धिका'त..! सुरक्षा व्यवस्थेची जावो रया, राष्ट्रद्रोह्यांप्रत भूतदया, सक्षम आहे पोलिस खाते, ''बडे शहरों में छोटी छोटी बाते!" इकडे बघा, महागायक १२वे वर्ष प्रसिद्धि-दायक, इकडे आमचे महागुरू, "चल बेट्या, हो जा शुरू!"   मायमराठी की तो मज्जाय 'भय्या'! तिचे सैनिक...

आम्ही कोण...?

आज, दिनांक २७ ऑगस्ट २०१२च्या लोकसत्तेत आलेल्या लेखावरून प्रेरित होऊन झालेले केशवसुतांच्या कवितेचे विडम्बन! खूप दिवस हा विषय डोक्यात होताच.. आज ह्या संपादकीयामुळे किल्ली बसली, आणि एकटाकी लिहून काढलं ते इथे पोस्ट करतो !  'प्रस्थापित म्हणवून घ्यावे लागणाऱ्या' समस्त सरकारी सारस्वतांप्रत समर्पित :  आम्ही कोण म्हणोनि काय पुससी ह्या अग्रलेखातुनी ? श्रोत्यांनी जग व्यापिलेच अवघे आम्हांस भटकायला, विश्वी राजकवींपरि विचरतो सर्वत्र हो लीलया        सरकारातुनी कार्यभार मिळवू आम्ही 'महामंडळी'*,        सारा हि बडिजाव येथ मिरवू, उचलू 'टग्यांची' तळी 'पाणि'स्पर्श हि राजकारणि महानेत्याकडुन् मागुया ''मोठाले अनुदान?'', ते हि मिळवू; संमेलनालागि या            फोले पाखडिता क्वचित् दिसतसे नि:स्वार्थी आम्हांमध्ये         सारे काही मिळोनि हो दळिदरी आम्हीच विश्वामध्ये कोट्यातून न लाभले घर असा; वा लाभ कसला उगी;  'एस्.टी.-ट्रेनमधूनी त्या सवलती ना घे असा' ना जगी       ...

फेसबुकावर टगे-सोयरे

जर्मनीत येऊन आणि फेसबुकचा वापर सुरु करून एक वर्ष झालं! हे असं वर्ष-तिथी-तारीख वगैरेंचा हिशेब मांडताना माझं मलाच हसू आलं  ! पण विषय आहे फेसबुकचा...त्यामुळे तिथी , पंचांग , अध्यात्म , क्रांती , पुरोगामी , ब्राह्मणी-अब्राह्मणी ह्या शब्दांचा वापर केल्याशिवाय , या न त्या माध्यमातून स्टेटस अपडेट केल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय फेसबुकचा फील आल्यासारखे वाटत नाही. असो..! (सुरुवातीलाच हा ' असो ' आल्यामुळे ह्या शब्दांचा किती उबग आला असेल हे सूज्ञांस कळू शकेल!) तर..सांगायचे असे कि जर्मनीत आल्यापासून अस्मादिकांचा फेसबुकावरील संचार वाढला! तसे पूर्वी मी ऑर्कुट वापरत असे. पण माझ्या एका अल्बमच्या प्रकाशन कार्यक्रमात एका मोठ्या , नामांकित व्यक्तीने ' फेसबुक पर मिलते रहो..! ' असे सांगितल्यामुळे मी ह्या झुकरबर्गाच्या ' लवासा ' मध्ये ((रावणाच्या लंकेत ' या चालीवर वाचावे)प्रवेश करते झालो. तेव्हा हे ' लवासा ' डेव्हलपिंग फेजमध्ये होतं. ऑर्कुट तेजीत होतं. पण मला या सोशल नेटवर्किंग साईट्सरूपी लंकेच्या , सर्वांना अक्सेस करण्यास मुभा असलेल्या सिक्रेट चेंबरमध्ये एवढ्या च...

मधुशाला

Image
उमर खय्याम यांच्या रुबाया वाचून, त्याने भारलेल्या प्रयाग (अलाहाबाद) येथील हरिवंशराय 'बच्चन' नामक  एका तरुणाने  त्या रुबायांच्या धुंदीत हिंदी कवितेला एक अनमोल प्रातिभ-रत्न प्रदान केलं. छायावादी कवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या बच्चनांच्या या मधुशालेच्या शेकडो आवृत्त्या निर्माण होऊन हि मधुशालेच्या मधुरसाचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. मदिरा जुनी होत जाते तशी ती अधिक रुचकर होऊन जाते..तिची मादकता वाढत जाते असं म्हणतात. या मधुशालेचे मराठी, कन्नड, तेलुगुपासून ते अगदी देववाणी संस्कृतमध्येही तिचे अनुवाद झाले आहेत.  वयाच्या १५व्या वर्षी माझ्या हाती ही मधुशालेची अक्षय्य सुरई लागली, ती गंगेच्या काठी, वाराणसी येथे असताना!  आयुष्यातला  '३१ मे'चा तो दिवस..मी  कधीही विसरू शकत नाही! त्या दिवशी जो हा प्याला तोंडाला लावला, तो अजून प्यायचा थांबलोच नाही. रोज 'शुभं करोति..' म्हटल्याप्रमाणे मी त्यातल्या रुबाया नित्यनेमाने म्हणू लागलो. बघताबघता त्या तोंडपाठही झाल्या! त्यात पौगंडावस्थेचे ते वय! फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर वयानेहि आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. ति...

आभाळाएवढा मोठा माणूस: प्रा. राम बापट सर

Image
आज सकाळी सकाळी मन उदास झालं...! कारण माहित नाही...! साखरझोपेच्या वेळेतच मला खूप अस्वस्थ वाटू लागलं..खिडकीतून उन्हं येतायत का म्हणून डोळे किलकिले करून पाहिले. पण पडदे लावलेले होते. एरवी पडदे लावले असले तरी सूर्यप्रकाशामुळे डोळ्यातली झोप उडतेच रोज..पण आजचं कारण काही तरी वेगळंच असावं. त्याच अस्वस्थतेत उठलो. उठल्यावर ती अस्वस्थता अधिक गडद झाली. लगेच आईला फोन केला..पण तिच्याशी बोलूनही बरे वाटेना..! उठून अंघोळ केली..देवासमोर उभा राहिलो. नकळत डोळ्यात पाणी तरळले.. कारण.. माहित नाही! काहीतरी झालंय..किंवा होणार ही अशुभाची जाणीव मनाला थरथरवून गेली. घाई-घाईत तसाच आवरून युनिव्हर्सिटीमध्ये आलो. आल्यावर लॉग-इन केलं..तो माझ्या पुणे विद्यापीठातील मार्गदर्शिका, प्राध्यापक डॉ. कुलकर्णीबाईंचा ई-मेल आला..''काल रात्री प्रा. राम बापट गेले..एक जाणता माणूस गेला..!" मगाशी आलेली अस्वस्थता उसळून बाहेर आली. तिचे कारण कळले..! प्रा  राम बापट म्हणजे सुरेंद्र बारलिंगे, ग.प्र. प्रधान, नरहर कुरुंदकर, य.दि.फडके, दुर्गाबाई, इरावती कर्वे अशा दिग्गजांच्या मांदियाळीतील आमच्या समोर वावरणारा, आमच्याशी सहज ...